|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पासधारक प्रवाशांना आरक्षित डब्यांमध्ये प्रवेश द्या

पासधारक प्रवाशांना आरक्षित डब्यांमध्ये प्रवेश द्या 

प्रतिनिधी / बेळगाव

दैनंदिन स्वरुपात रेल्वे पासचा वापर करून बेळगाव ते मिरज दरम्यान प्रवास करणाऱया पासधारक प्रवाशांना एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यात प्रवेश दिला जावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. बुधवारी सर्व प्रवाशांनी एकत्रित येऊन रेल्वे स्थानक अधीक्षकांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.

पासधारक प्रवाशांना आरक्षित डब्यात प्रवेश नाकारून तिकीट तपासणीस त्यांना बिगर आरक्षणाच्या डब्यातून प्रवास करण्याची दडपशाही करीत आहेत. अशा डब्यांची अपुरी संख्या आणि पासधारक प्रवाशांची मोठी संख्या यांचा ताळमेळ जमत नाही. त्यामुळे नियमित प्रवास करणारे नोकरदार प्रवासी, व्यावसायिक या साऱयांना धक्काबुक्की सोसत प्रवास करावा लागतो. त्याचप्रमाणे काही वेळा इतर प्रवाशांसमवेत वादावादी आणि हाणामारीचे प्रकारही घडतात. या सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन अशा प्रवाशांकरिता आरक्षित डब्यांमधून प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी प्रवाशांनी आपल्या सहय़ांद्वारे निवेदन देऊन केली. स्टेशन अधीक्षक एस. सुरेश यांनी आपण याबाबत लक्ष घालून लवकरच पावले उचलू, अशी ग्वाही दिली..