|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गुहागरचे माजी सभापती नंदू पवार यांचे निधन

गुहागरचे माजी सभापती नंदू पवार यांचे निधन 

उत्तम प्रशासक व संघटक हरपला

प्रतिनिधी /गुहागर

माजी जिल्हा परिषद सदस्य व गुहागर पंचायत समिती सभापती नंदकिशोर उर्फ नंदू राजाराम पवार यांचे शनिवारी सकाळी 11.45 वाजता चिपळुणातील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.

पवार हे मुळचे तालुक्यातील पवारसाखरी येथील आहेत. मात्र व्यवसायानिमित्त ते चिपळूण येथे स्थायिक झाले. राष्ट्रवादीचे खंदे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. 1997मध्ये ते अडूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. तालुक्यावर भाजप-सेनेचे वर्चस्व असताना तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी युवावर्गाची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली होती. परिणामी 2002च्या पंचायत समिती निवडणुकीत सदस्य म्हणून ते निवडून आले. पंचायत समितीवर राष्ट्रवादी 5, तर भाजप-शिवसेना 5 असे संख्याबळ असताना शिवसेनेच्या सदस्याला बरोबर घेऊन त्यांनी पंचायत समितीचे सभापतीपद भूषवले. युतीमधील एक मत फोडण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती. पंचायत समितीवर ते सलग पाच वर्षे सभापतीपदी कार्यरत होते. प्रशासनाची उत्तम जाण असलेले तसेच युवावर्गाला संघटीत करण्याची कला असल्याने तालुक्यात त्यांनी राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न केला. पंचायत समिती सभापती असताना अनेक विकासकामे मार्गी लावत त्यांनी सभापती कसा असावा, याची जाणिव सर्वच पक्षांना करून दिली होती. पंचायत समितीचा कारभार अधिक गतीमान करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हात आहे.

पंचायत समितीमधील कामाच्या जोरावर त्यांनी सन 2002मध्ये गुहागर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आले. त्यावेळी तालुक्यात राष्ट्रवादी अधिक मजबूत झाली होती. मात्र विधानसभेमध्ये मिळालेल्या अपयशामुळे माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीमध्ये घेण्यापासून ते गुहागरचे पालकत्व स्वीकारण्यासाठी व त्यांना गुहागरमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेतलेल्या तालुक्यातील पदाधिकाऱयांमध्ये पवार अग्रस्थानी होते. एवढेच नव्हे तर आमदार जाधव यांना सन 2009च्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी तसेच त्यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्याकडे मागणी करणाऱयांमध्ये ते पुढे होते.

नंदू पवार यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी निकटचे संबंध होते. त्यामुळे ते आजारी पडल्यावर त्यांच्या निवासस्थानी स्वतः शरद पवार यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. गेल्या काही वर्षांपासून त्यांना मणक्याच्या आजाराने त्रस्त केले होते. या आजाराने गंभीर रूप घेतले होते. त्यांच्यावर मोठय़ा रूग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. मात्र त्याचा फायदा झाला नाही. यामुळे त्यांच्यावर घरीच सर्व उपचार सुरू होते आणि प्रदीर्घ आजाराने अखेर शनिवारी सकाळी 11.45 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच तालुक्यासह जिल्हाभरातून अनेकांनी चिपळूण येथे त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. शनिवारी रात्री 9 वा. त्यांची अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Related posts: