|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » करोली एम येथे शेततळ्यात बुडून बहिणींचा मृत्यू

करोली एम येथे शेततळ्यात बुडून बहिणींचा मृत्यू 

प्रतिनिधी/ मिरज

तालुक्यातील करोली एम येथे शेततळ्यात बुडून जिजाबाई सतिश वाघ (वय 14) आणि केशविनी सतिश वाघ (वय 5) या सख्ख्या बहिणींचा शनिवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना पोलिस पाटील मनिषा प्रमोद पाटील यांनी माहिती दिली.

करोली एम येथे लिंबाचे शेत या नावाचा भाग आहे. या भागात सतिश वाघ आणि कुटुंबियांची चार एकर शेती आहे. शेतातच त्यांचे घर आहे. बागायत करावी, या हेतूने त्यांनी शासनाच्या अनुदानातून शेतातील घराजवळच शंभर बाय शंभर क्षेत्रफळ असलेले आणि 20 फुट खोल असलेले शेततळे खोदले आहे. गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस पडल्याने शेततळे पूर्ण भरले. सतिश वाघ यांना तीन अपत्य असून, 15 वर्षांचा मोठा मुलगा आहे. तर जिजाबाई आणि केशविनी या दोन मुली आहेत.

वाघ यांचे कुटुंबिय शेततळ्यात पाणी असल्याने धुणे धुण्यासाठी व पाणी भरण्यासाठी नेहमी जात असत. सदर दोन्ही बहिणीही या शेततळ्यात पाणी भरण्यासाठी किंवा धुण्यासाठी जात असत. त्यावेळी पाणी कमी होते. त्यामुळे पाण्यात बुडण्याची शक्यता कमी होती. मात्र, गेल्या काही दिवसांत पाउढसामुळे शेततळे पूर्ण भरले आहे.

शनिवारी सायंकाळी त्या दोन्ही बहिणी नेहमीप्रमाणे शेततळ्याकडे गेल्या. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. यापैकी एकजण तोल जाऊन पाण्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरीही शेततळ्यात बुडाली. सायंकाळची वेळ असल्यामुळे ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही. बराच उशिर मुली घरी आल्या नसल्याने वाघ कुटुंबियांनी शेतात शोध घेतला असता शेततळ्यात त्या दोघींचा मृतदेह आढळून आला.

रात्री उशिरा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वाघ कुटुंबिय प्रतिकुल परिस्थितीतून शेतीच्या माध्यमातून प्रगती करण्याचा प्रयत्न करीत होते. गेली काही वर्षे दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे पिकांची स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे सतिश वाघ यांनी धाडस करुन शासनाच्या अनुदानातून शेततळे मंजूर करुन घेतले होते. त्यातून बागायत करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, या शेततळ्यानेच घात केला. दोन सख्ख्या बहिणींचा या तळ्याने प्राण घेतला. या घटनेमुळे करोली गावात हळहळ व्यक्त होत होती.