|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा पालिका उद्यानाची दुर्दशा

फोंडा पालिका उद्यानाची दुर्दशा 

महेश गांवकर/ फोंडा

फोंडा शहराच्या मध्यभागी असलेले पालिका उद्यान शाळांच्या सहलीसाठी प्रसिद्ध होते. सुट्टीचा आनंदोत्सव साजरा करणाऱया बालगोपाळांनी हे गजबजलेले असायचे. हिरवाईने नटलेले व फुलझाडांनी सजलेले हे पालिका उद्यान शहराची शान वाढवित होते. आज या उद्यानाला अवकळा आली आहे. फेंडा पालिकेने या उद्यानाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. फोंडा तालुक्यातील गरीब व श्रमिक कामगारांचे आपल्या मुला-बाळांसमवेत एकमेव विरंगुळय़ाचे ठिकाण असलेल्या पालिका उद्यानाची आज दुर्दशा झालेली आहे. या उद्यानाची देखरेख करण्याची नितांत गरज असल्याचे येथे फेरफटका मारून आल्यानंतर समजते. सदर उद्यानाचे बाकडे मोडलेल्या स्थितीत असून, लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले मेरी गो राऊंड, झोपाळे अत्यंत गंजलेल्या स्थितीत आढळतात.

पालिका उद्यानाची डागडुजी करण्यासाठी कामगार नेमलेले असूनही अशी वाताहत होण्यामागच्या कारणाचा शोध घेणे अवघड आहे. पालिकेच्या उद्यानाची रंगरंगोटी झालेली नाही. पालिकेतर्फे ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणाबाजी केली जाते. पण उद्यानात निवांत बसण्यासाठी येणाऱया लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याच्याही अनेक तक्रारी आहेत.

प्रवेशद्वारावर असलेले झाडाचे तुटलेले कुंपण हटवावे

उद्यानाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या झाडाच्या खोडाचे मूळ व त्याला चोहोबाजूनी वेढलेला भिंतीचा असलेला कठडा येथे भेट देणाऱया लोकांवर पडून गंभीर दुर्घटना घडू शकते. ते येथून त्वरित हटविण्याची गरज भासू लागली आहे. मेरी गो राऊंड साठी असलेल्या लोखंडी साच्यावर भक्कम लाकडी फळय़ा बसवून बालगोपाळांसह भेट देणाऱया लोकांची सोय करावी अशी मागणी होत आहे. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी उभारलेले पुतळे रंगरंगोटीविना फिके पडल्याचे दिसते.

पालिका मुख्याधिकारी स्वत: लक्ष घालणार

यासंदर्भात पालिका मुख्याधिकारी नवनाथ नाईक यांच्याकडे विचारणा केली असता या कामाची तत्काळ निविदा काढण्यात येणार असून त्वरित कामाला सुरुवात होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच गंजलेले खेळण्याचे साहित्य बदलण्यात येणार असून रंगरंगोटी केली जाईल तसेच लोकांना प्रवेशद्वारावर अडथळा निर्माण करणारे मोडलेल्या भिंतीचे अवशेष हटविण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

फोंडय़ात मॉल संस्कृती नसल्यामुळे उद्याने गजबजतात

फोंडा शहरात मॉल संस्कृती नसल्यामुळे आज खिशाला परवडणाऱया लोकांची पावले खासगी गार्डन स्वरूपातील स्पाईस प्लान्टेशनच्या सहलीकडे किंवा देवदेवळांच्या परिसरात सजविलेल्या उद्यानांकडे वळतात. पण याठिकाणी सामान्य जनतेला भेट द्यायला, खिशाला परवडणारे नसते किंवा मंदिर परिसरात सुरक्षारक्षक नेमलेले असल्याने मनमुराद आनंदही लुटता येत नाही तेव्हा सर्वसामान्य गरीब व श्रमिक लोकांना सरकारी उद्याने गाठण्याशिवाय पर्याय नसतो. पालिका उद्यानात  निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षण गाठण्यासाठी येणाऱया ग्राहकांचा येथे आल्यावर भ्रमनिरास होतो. परिसराच्या आजूबाजूला प्राप्त झालेले गलिच्छ दुर्गंधीयुक्त स्वरूप येथे भेट देणाऱयांना सहन करावे लागते. ही अवस्था पाहूनच याठिकाणी कोणी पुन्हा भेट देणे टाळेल. त्यामुळे हा परिसर आता ओस पडू लागला आहे. याकामी पालिकेने त्वरित लक्ष घालून उद्यानाचे सुशोभिकरणाचे काम करणे आवश्यक असून मुलंना खेळण्यासाठी असलेल्या चक्राची दुरूस्ती दिवाळीच्या सुट्टीच्या आधी करावी जेणेकरून मुले सुट्ठीत मनसोक्त खेळू शकतील व पुन्हा एकदा हे उद्यान पुर्वीसारखे गजबजू लागेल.  

Related posts: