|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जमीन मोजणी थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन

जमीन मोजणी थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन 

रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचा इशारा

उपविभागीय अधिकाऱयांना दिले निवेदन

प्रतिनिधी /राजापूर

तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असतानाही जमिनी मोजणीबाबत नोटीसा बजावल्याने रिफायनरीविरोधी शेतकरी व मच्छीमार संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱयानीं मंगळवारी उपजिल्हाधिकारी तथा भू संपादन अधिकारी यांच्या नावचे निवेदन उपविभागीय अधिकाऱयांना सादर करत आपला तीव्र विरोध दर्शवला. प्रकल्पग्रस्तांना पाठवलेल्या नोटीसा तत्काळ रद्द करून जमीन मोजणी प्रक्रिया थांबवावी अन्यथ तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

राजापूर तालुक्यातील नाणारसह परिसरातील 14 गावांमध्ये जगातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाला बहुतांश स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. मात्र शासन हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाने काही प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनाच्या नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीसीला एक महिन्याच्या आत उत्तर देणे अपेक्षित असून अनेकांनी लेखी स्वरूपात प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे याबाबत जनसुनावणी घेऊन प्रत्येक जमिन मालकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळावी अशी प्रकल्पग्रस्तांची अपेक्षा आहे.

मात्र प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष करत जमिन मोजणी करण्यासंबंधी नोटीसा पाठविल्या. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पग्रस्तांची सोमवारी संध्याकाळी एक तातडीची बैठक झाली. या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे मंगळवारी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

14 गावांतील प्रकल्पग्रस्तांना भुसंपादनाच्या नोटीसा आल्या आहेत. मात्र प्रकल्पग्रस्तांना बाजू मांडायला न देता किंवा जनसुनावणी न घेता अशा नोटीसा पाठविणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे उल्लंघन करणारे आहे. आपला निर्णय हा एकतर्फी असून तो भूधारकांवर अन्यायकारक आहे. असे येथील उपविभागीय अधिकारी अभय करगुटकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तरी आपल्याकडून पाठविण्यात आलेल्या नोटीसा तात्काळ रद्द करा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसे न झाल्यास संघटनेला तिव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी रिफायनरी विरोधी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ओंकार प्रभुदेसाई, कमलाकर कदम, मजिद भाटकर, रूपेश अवसरे, भगवान वालम, संजय पाळेकर, यशवंत कार्शिंगकर आदीजण उपस्थित होते. दरम्यान याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे प्रशासनाचे लक्ष लागून राहीले आहे.

Related posts: