|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘महाकाली’चालकास 10 वर्षे सक्तमजुरी

‘महाकाली’चालकास 10 वर्षे सक्तमजुरी 

जगबुडीवरील भीषण अपघातात प्रकरण

37 जणांना गमवावे लागले होते प्राण

चालक संताजी कीरदत्तची याचनाही नामंजूर

प्रतिनिधी /खेड

मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पुलाजवळ महाकाली या खासगी आरामबसला झालेल्या अपघातातप्रकरणी बसचालक संताजी कैलास कीरदत्त यास जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंगळवारी 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. बसचालकाने न्यायालयाकडे केलेली याचनाही नामंजूर करण्यात आली. 4 वर्षांपुर्वी झालेल्या या अपघातात 37 प्रवाशांच्या मृत्यू झाला होता.

19 मार्च 2013 रोजी पहाटे 3.15 वाजता समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालक संताजी कीरदत्त याच्या ताब्यातील महाकाली ही बस जगबुडीच्या पुलाचा कठडा तोडून 45 फूट खोल नदीपात्रात कोसळली होती. या भीषण अपघातात 37 जण जागीच ठार झाले होते. यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश होता. या अपघातात 14 जण गंभीर जखमी झाले होते. या मृत्यूच्या तांडवात चालक संताजी कीरदत्तला मात्र कुठलीही दुखापत झाली नव्हती.

गोव्याहून सुटलेली ही बस सुरूवातीला संतोष राठोड चालवत होता. कुडाळला आल्यानंतर चालक बदलल्यानंतर संताजी कीरदत्तने खासगी आरामबसचा ताबा घेतला. मुंबईच्या दिशेने जाणारी ही बस जगबुडीनजीक आली असता बस नदीपात्रात कोसळून झालेल्या भीषण अपघाताने सारेच हादरले होते. अपघातादरम्यान चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. या भीषण अपघाताच्या सुनावणीदरम्यान 6 साक्षीदार तपासण्यात आले. तपासिक अंमलदार म्हणून तत्कालीन पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे होते.

सरकारी पक्षातर्फे ऍड. मेघना नलावडे यांनी युक्तीवाद केला. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी बसचालक संताजी कीरदत्त यास भादंवि कलम 304 नुसार 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 10 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. भादंवि कलम 274 अन्वये 6 महिने सक्तमजुरी व 1 हजार रूपये दंड, भादंवि कलम 337 अन्वये 6 महिने सक्तमजुरी व 500 रूपये दंड, भादंवि कलम 338 अन्वये 2 वर्षे सक्तमजुरी व 1 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षेनंतर बसचालक संताजी कीरदत्त याने न्यायालयाकडे आपणास लहान मुले असून शिक्षेत सवलत मिळावी, अशी याचनाही केली होती. या याचनेवरही सुनावणी होऊन त्याची याचना नामंजूर करण्यात आली.

Related posts: