|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » माध्यमांनी सत्य मांडतच रहावे : श्रीनिवास जैन

माध्यमांनी सत्य मांडतच रहावे : श्रीनिवास जैन 

पुणे / प्रतिनिधी :

सध्या लोक सत्य ऐकण्याच्या आणि स्वीकारणाच्या मानसिकतेत दिसत नसले तरी माध्यमांनी सत्य सांगतच राहिले पाहिजे. तरच त्यांच्या विश्वासार्हतेला बळकटी मिळेल, असे मत एनडीटिव्हीचे संपादक श्रीनिवासन जैन यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

 पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेत’ जैन बोलत होते. ज्येष्ठ भाषातज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी, पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे यावेळी उपस्थित होते.

 जैन म्हणाले, अभिव्यक्ती आणि प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशभरात पत्रकार विविध मार्गांनी विचारमंथन करत आहेत. केवळ मोर्चे, निषेध अथवा चर्चा करून चालणार नाही. डॉ. दाभोळकर, कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्येच्या तपासातून अद्याप काही हाती सापडले नाही. पत्रकारांनी यासाठी एकत्र येत तपास यंत्रणांवर दबागट निर्माण केला पाहिजे. सत्याची वाट कायम ठेऊन सरकारी कार्यक्रम, मंत्री यांच्यावर बहिष्कार टाकण्यासारख्या अभिनव मार्गाचा अवलंब माध्यमांना करावा लागेल.

 लंकेश यांच्या हत्येबाबत प्रक्षोभक वक्तव्य करणाऱया निखील दधिच याला पंतप्रधान ट्वीटरवर फॉलो करत आहेत. सर्वांनी आवाज उठवूनही त्यांनी अद्याप त्याला अनफॉलो केलेले नाही. यातच सरकारी धोरणांच्या विरोधात काही बोलले तर त्याच्या वाईट प्रतिक्रिया येतात. यात शिव्या आणि वैयक्तिक जीवनावर टिका टिपण्णी असते, यापूर्वी कधीही असे झाले नाही. भावनिक प्रभाव टाकला जात असल्याने त्यात गुरफटलेले लोक सत्य स्विकारत नाहीत, असे जैन यांनी स्पष्ट केले.

 आजकाल माध्यमांमध्ये सरकारच्या बाजूने बोलणारे आणि विरोधात बोलणारे असे दोन गट तयार झाले आहेत. यात माध्यमांच्या मालकांवर सामाजिक, आर्थिक दबाव येत आहे. हा दबाव स्विकारणाऱयांची संख्या कमी होत आहे. हे घातक असून काही माध्यमे तर सरकारचे पाठराखे असल्यासारखेच वागत आहेत. माध्यमांच्या मालकांनी पत्रकारिता आणि व्यवसाय यात अंतर ठेवले पाहिजे. लोकांना गोंधळात न टाकता वस्तूस्थिती दाखविणारी पत्रकारिता केली पाहिजे. या स्पर्धेतही जे सत्यकथन करतील, तरच ते भविष्यात टिकून राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

 

Related posts: