|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डिगस येथे विजेचे तांडव

डिगस येथे विजेचे तांडव 

गोसावी कुटुंबीय भयभीत, दीड ते दोन लाखाचे नुकसान

प्रतिनिधी / ओरोस :

विजयादशमी दिवशीच डिगस-तळीवाडी येथील विठ्ठल लक्ष्मण गोसावी यांच्या परिवाराला विजेच्या तांडवाला तोंड देत मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले. यात गोसावी कुटुंबियांचे दिड ते दोन लाखाचे नुकसान झाले.

शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास डिगस येथे पाऊस सुरू होता. यात घराच्या पुढील भागात विठ्ठल गोसावी यांचा मुलगा गणेश गोसावी उभा असताना विजेचा तीव्रलोळ घराच्या शेजारील माडावर पडला. तेथून वीज प्रचंड वेगाने माडा शेजारील असलेल्या घरातील किचनमध्ये शिरली. किचनमध्ये काम करीत असलेल्या गोसावी यांच्या स्नुषा ग्रंथाली गोसावी यांना प्रचंड धक्का बसला. हा धक्का एवढा तीव्र होता, की किचनमधील टय़ूबलाईट्स, फ्रिज, फॅनने क्षणार्धात पेट घेतला.  त्यांच्या सोबत काम करीत असलेल्या आरती गोसावी यांच्या चेहऱयावर पेटत्या चुलीमधील राख उडाल्याने त्या भाजल्या. तर अवघ्या दोन वर्षाचा नातू यज्ञेश गोसावी हा जमिनीवर आपटला. हे तिघे जखमी झाले. नंतर कानठळय़ा बसविणारा आवाज करीत विजेचा लोळ विद्युत मीटरच्या दिशेने गेला. यात संपूर्ण घरातील इलेक्ट्रॉनिक सामान टीव्ही, मोबाईल, घराचे फिटींग पूर्णत: भस्म झाले व वितळूनही गेले. घराच्या भिंतीला तडे गेले तसेच मोठी छीद्रे पडली आहेत. होत्याचे नव्हते झाल्याने गोसावी कुटुंब भयभीत झाले आहे. त्यांचे दिड ते दोन लाख रुपये नुकसान झाले आहे. 

हे वृत्त समजताच उपसरपंच बाळा पवार, जि. प. सदस्य अमरसेन सावंत, जि. प. माजी सदस्या रुक्मिणी कांदळगावकर, नित्यानंद कांदळगावकर, पोलीस पाटील सुधीर राठोड व ग्रामस्थांनी तात्काळ गोसावी यांच्या घरी धाव घेतली व त्यांना मदत केली.