|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शांतताप्रिय गोवा गुन्हेगारीच्या विळख्यात !

शांतताप्रिय गोवा गुन्हेगारीच्या विळख्यात ! 

आज गोव्यातील लोकप्रतिनिधींनीही गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन, पाठबळ देण्याऐवजी ती मूळातूनच नष्ट करण्यासाठी वावरावे. शांतताप्रिय गोवा राज्याची प्रतिमा स्वच्छ राहावी, त्याला कलंक लागू नये याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे, तरच सुजलाम, सुफलाम सुसंस्कृत गोवा राज्याचे स्वप्न नजीकच्या काळात सफल ठरेल.

 

आज शांतताप्रिय गोव्यात भयानक अशा गुन्हेगारीच्या घटना घडत असून सुवर्णभूमी गोवा (भांगराळे गोंय), सुंदर गोवा (सोबितकाय गोंय) असे संबोधल्या जाणाऱया गोवा राज्याच्या प्रतिमेला गालबोट लागते की काय, अशी चिंता सतावू लागली आहे. यामुळे गोवा राज्यापुढे भविष्यात काय वाढून ठेवले आहे, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे.

गोवा राज्यात गेल्या आठवडय़ात नवरात्रोत्सवात धार्मिक वातावरण असूनही अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्या. शांतताप्रिय गोव्यासारख्या राज्याला या घटना लाजिरवाण्या आहेत. हायस्कूल, कॉलेज कॅम्पसमध्येही आता विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी बोकाळली असून विद्यादानाच्या पवित्र ठिकाणीदेखील सुरीहल्ला तसेच अन्य प्रकार होत असल्याने गोव्यातील युवा पिढीची वाटचाल नेमकी कुठल्या दिशेने चालली आहे, याबाबत खंत आहे. गोव्यातल्या एका महाविद्यालयाच्या आवारात गेल्या आठवडय़ात एका विद्यार्थ्याने दुसऱया विद्यार्थ्यावर सुरीहल्ला केला. ही गंभीर घटना विचार करण्याजोगी आहे. गोव्यातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन यावर विचारमंथन करून योग्य तो तोडगा काढणे आवश्यक ठरते.

बलात्कार, लैंगिक शोषण या प्रकरणात ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावर आरोप निश्चित झाले आहेत. हे प्रकरण चर्चेत असताना हल्लीच पालये-पेडणे येथील ‘लैंगिक अत्याचार’ प्रकरण गाजले. वास्कोतील विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हेगार अद्याप मोकाट आहेत. या घटनेला तीन वर्षांहून अधिक काळ झाला, मात्र या पीडित विद्यार्थिनीच्या पालकांचा न्यायालयीन लढा अजूनही चालू आहे. गोवा राज्यातील विद्यार्थी आणि विद्यालयेही सुरक्षित नाहीत हे यातून स्पष्ट होते. ‘सरोगेट मदर’च्या नावाखाली मुलीवर झालेले लैंगिक अत्याचार प्रकरणही सध्या गोव्यात गाजत आहे. शिवोली येथे युवती जाळपोळप्रकरणी अद्यापही पोलिसांना धागेदोरे सापडलेले नाहीत.

आपल्याकडे महिलांवर सर्वाधिक अत्याचार केले जातात. त्यातून महिलांचे मानसिक खच्चीकरण होत जाते आणि त्यामुळे मनाने कमजोर झालेल्या या महिला आत्मघाताचे पाऊल उचलतात. त्यामुळे यावर अधिक अभ्यास करून महिलांच्या जागृतीसाठी प्रयत्न करण्याची गरज उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी हल्लीच व्यक्त केली आहे. अत्याचार प्रकरणात आज गोव्यातील महिलाही तेवढय़ाच प्रमाणात जबाबदार ठरतात. महाराष्ट्राच्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची विविध ठिकाणी महिलांसाठी मार्गदर्शन सत्रे होत आहेत. ‘महिलांनी अंगभर कपडे घातल्यास कुणा पुरुषाची बिशाद आहे महिलाकडे वाईट नजरेने बघण्याची?’ हे वाक्य त्या वारंवार बोलत असतात. गोव्यात आज समुद्रकिनारी संस्कृतीमुळे ‘नाईट लाईफ’ संस्कृती रूजत आहे. पूर्वी संध्याकाळी 7 च्या आत घरात अशी पद्धत होती. त्यामुळे सुसंस्कृतपणा जपला जायचा. आता परिस्थिती उलट आहे. आज गोमंतकीय युवक-युवतींचा संध्याकाळनंतरच वावर सुरू असतो आणि ‘रात्रीस खेळ चाले’ प्रकार सुरू असतो. यातूनच अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. पर्यटनाच्या नावाखालीही गोव्यात अनेक ठिकाणी स्वैराचार सुरू आहे. सीरियल किलर महानंद नाईक प्रकरणातून तसेच तशाच प्रकारच्या अन्य घटनांतून आज गोमंतकीय महिलावर्गाने सावध राहणे योग्य ठरते. महिलांवरील अत्याचाराविरोधात केवळ पत्रकार परिषद घेऊन तसेच नावापुरती निदर्शने करून आवाज उठविला जातो, परंतु त्यासंदर्भात ठोस अशी प्रत्यक्ष कृती योजना आखली जात नसल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घातले जात आहे, ही मोठी शोकांतिका आहे.

 गोव्यात पर्यटन हंगामाला प्रारंभ झाला असून गोव्यात पर्यटक बहुसंख्येने यावेत, पर्यटनाला कुठलीही बाधा येता कामा नये, पर्यटन संस्कृती बदनाम होऊ नये म्हणून गोव्यात येणाऱया पर्यटकांच्या अति स्वैर वागण्यावरही पोलीस लगाम घालू शकत नाहीत. पर्यटनाच्या नावाखालीही स्वैराचार सुरू आहे, रात्री-बेरात्री उशिरापर्यंत चालणाऱया आणि परिसरातील स्थानिकांना त्रासदायक ठरणाऱया पाटर्य़ा, नियम तोडणाऱया, ध्वनीप्रदूषण करणाऱया नृत्यरजनी याला कुठे तरी प्रतिबंध करणे आवश्यकच ठरते. अन्यथा गोवा संतभूमी, योगभूमी, पुण्यभूमी न ठरता भोगभूमी ठरण्यास वेळ लागणार नाही.

गोवा राज्यात राजकीय कवच घेऊन खुलेआम गुन्हेगारी बोकाळत चालली आहे. गोव्यात आज परप्रांतियांचा लोंढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे गुन्हेगारी घडत आहे, हीच केवळ सबब सांगितली जाते. परप्रांतीय आज गोव्यात केवळ आपले पोट भरण्यासाठी, पैसै कमाविण्यासाठी कामानिमित्त, व्यवसायानिमित्त येत आहेत, त्यावरही थोडा अंकुश हवाच. मात्र आजकाल मोठय़ा प्रमाणात गोमंतकीय भूमिपुत्रच गुन्हेगारीच्या विश्वात वावरत असल्याचे उघडकीस येत आहे. राजकीय बळाचा वापर करून, मंत्री-आमदारांच्या पाठबळावर, त्यांच्या वरदहस्ताने अनेक गुन्हेगारी कृत्ये करत आहेत. पोलीस यंत्रणा राजकारण्यांच्या दडपणातच वावरत असताना दिसते व गुन्हेगारीकडे डोळेझाक करताना दिसते आहे. केवळ परप्रांतीय गुन्हेगारावरच कारवाई होताना दिसते, मात्र गोमंतकीय भूमिपुत्र गुन्हे करूनही मोकाट फिरत असल्याचे भयाण चित्र दिसून येत असून ही वस्तुस्थिती आहे. काही पोलीस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींबरोबरही राजरोस वावरताना दिसतात, हे चित्र खरोखरच गंभीर आहे.

आपण अनैतिक धंदे करण्यास प्रोत्साहन देत नसल्याने आपल्याला धमक्या येत असल्याचे खुद्द जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी मान्य केले आहे. आपल्याला पुरेसे संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे. गैरकृत्यांना थारा न देण्याच्या केलेल्या प्रतिज्ञेमुळे खरोखरच मंत्री पालयेकर यांचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटते. मंत्री पालयेकर हे एक चांगल्यापैकी शास्त्रीय गायक कलाकार आहेत. त्यांच्यावर संगीत कलेचे संस्कार झाल्याने साहजिकच त्यांच्या वागण्यात  विनम्रता आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा न देण्याचा त्यांनी केलेला निर्धार खरोखरच अभिमानास्पद आणि अभिनंदनीय आहे. अन्य राजकारण्यांनीही त्यांचा आदर्श घेऊन गोव्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढणे आवश्यक आहे.