|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » वय लपवणाऱया खेळाडूंवर ठेवणार सक्त नजर

वय लपवणाऱया खेळाडूंवर ठेवणार सक्त नजर 

यू-17 फिफा फुटबॉल विश्वचषक : आयोजन समितीसमोर नायजेरियाचे उदाहरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उद्यापासून (दि. 6) भारतातील 6 विविध ठिकाणी खेळवल्या जाणाऱया फिफा 17 वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केवळ या शतकात जन्मलेल्या खेळाडूंनाच सहभागी होता येणार असले तरी नायजेरियाचे उदाहरण समोर असल्याने या स्पर्धेत वय लपवण्याची पुनरावृत्ती होणार नाही, याकडे आयोजन समितीचे पूर्ण लक्ष असणार आहे. नेमार, रोनाल्डिन्हो, आंद्रेस इनेस्टा व झेवी हर्नांडेझसारखे दिग्गज खेळाडू या युवा विश्वचषकाच्या माध्यमातूनच जागतिक पटलावर आले असून त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. खेळाडूंनी आपले वय लपवू नये, याची खातरजमा करुन घेण्यासाठी त्यांच्या मनगटाची एमआरआय चाचणी देखील घेतली जाणार आहे.

फुटबॉल पदाधिकाऱयांच्या मतानुसार, सध्याच्या घडीला वय लपवण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे आणि त्याचमुळे फिफाला ‘मॅग्नेटिक रिझनन्स इमेजिंग इक्विपमेंट’ तैनात करावे लागले आहे. या एमआरआय स्कॅनिंगमुळे एखादा खेळाडू 17 वर्षापेक्षा अधिक आहे का, याची चाचपणी होऊ शकते व त्याचे निकाल जवळपास 99 टक्के तंतोतंत बरोबर असतात, असा तज्ञांचा दावा आहे.

‘सर्वप्रथम आपले खेळाडू 17 वर्षाखालील वयोगटातीलच आहेत, याची खातरजमा करुन घेण्याची सदस्य राष्ट्रांची जबाबदारी आहे. पण, आम्ही तितक्यावरच न थांबता स्वतंत्र चाचणी घेणार आहोत’, असे फिफाच्या प्रवक्त्याने याप्रसंगी सांगितले. नायजेरियाचा संघ या स्पर्धेत खेळणार नसल्याने व ब्राझीलचा सध्याचा संघ बराच कमकुवत असल्याने या स्पर्धेत जेतेपदासाठी अनेक दावेदार पुढे सरसावले आहेत. जेतेपदासाठी बरीच रस्सीखेच रंगणार, हे जवळपास निश्चित आहे. त्या पार्श्वभूमीवर, वयोगटात न बसणारा खेळाडू सहभागी होऊ नये, यासाठी फिफाचे विशेष प्रयत्न असतील.

या स्पर्धेला शुक्रवारी प्रत्यक्ष प्रारंभ होत असून जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर दोनवेळचे विजेते घाना विरुद्ध कोलंबिया आमनेसामने भिडतील तर मुंबईत न्यूझीलंड-तुर्की यांच्यात दिवसभरातील दुसरी लढत होणार आहे. या स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी विशेषतः ब्राझील संघाला काही मोठे धक्के बसले. पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) संघाचा नेमार म्हणून ओळखला जाणारा स्टार स्ट्रायकर व्हिनिसियस ज्युनियर याला त्याच्या फ्लेमिंगो या क्लबने स्पर्धेत सहभागासाठी चक्क परवानगीच नाकारली, हा त्यांच्यासाठी मोठा धक्का ठरला.

या निमित्ताने भारत प्रथमच एखादी फिफा स्पर्धा भरवत असून यजमान संघाचा दमदार प्रदर्शन साकारण्यावर भर असणार आहे. भारताचा अमेरिका, कोलंबिया व घाना यांच्यासह अ गटात समावेश असून अर्थातच हा गट कठीण मानला जातो. पण, पोर्तुगालचे माजी फॉरवर्ड व भारतीय संघाचे मॅनेजर लुईस नॉर्टन डे माटोस यांनी देखील फारशा अवास्तव अपेक्षा समोर ठेवलेल्या नाहीत. भारताने एखादा सामना जिंकण्याची शक्यता फक्त 5 टक्के इतकीच आहे, असे परखड मत त्यांनी यापूर्वीच नोंदवले आहे. तब्बल 23 दिवस चालणारा हा फुटबॉलचा कार्निव्हल देशभरातील 6 ठिकाणी खेळवला जाणार असून कोलकात्यात दि. 28 ऑक्टोबर रोजी रंगणाऱया मेगा फायनलने त्याची शाही सांगता होईल.

ब्लर्ब

1 जानेवारी 2000 पूर्वीचा जन्म आहे का, हे पाहण्यासाठी खेळाडूंच्या मनगटाची एमआरआय चाचणी घेतली जाणार आहे.

चिलीचा दियाझ म्हणतो, यंदा ब्राझीलला आणखी कडवी लढत देऊ

कोलकाता : फिफा यू-17 विश्वचषकात ब्राझीलविरुद्ध उभे ठाकण्याची संधी लाभली तर आम्ही आणखी कडवी लढत देऊ व दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिपमधील पराभवाची सव्याज परतफेड करणे, हेच आमचे मुख्य लक्ष्य असेल, असे चिलीचा आघाडीपटू ऍन्टोनिया दियाझ म्हणाला. यंदा ब्राझीलचा संघ ड गटात तर चिलीचा संघ फ गटात समाविष्ट असून बाद फेरीत ते आमनेसामने भिडू शकतात. यंदा मार्च महिन्यात दोन्ही संघ दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिपमध्ये एकमेकाविरोधात लढले, त्यावेळी चिलीला 0-5 अशा नामुष्कीजनक फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मात्र, तो आता इतिहास असल्याचे दियाज म्हणतो.

‘आमच्या वरिष्ठ गटातील संघाने 2015 साली कोपा अमेरिका स्पर्धेत जेतेपद संपादन केले, तो इतिहास आमच्या नजरेसमोर आहे. क्लब स्तरावर अर्सेनलकडून खेळणारा सांचेझ हा आमच्यासाठी हिरो आहे. तो केवळ माझ्यासाठी नव्हे तर पूर्ण चिली संघासाठी प्रेरणास्थान ठरत आला आहे. भारतातील वातावरण आमच्यासाठी बरेच प्रतिकूल आहे. पण, आम्ही पूर्ण अनुभव पणाला लावण्यासाठी सज्ज आहोत’, असे तो पुढे म्हणाला. दियाजचा संघसहकारी निकोलस ऍराव्हेनाने आपल्या गटात इंग्लंड व मेक्सिको यांच्याविरुद्ध लढणे कठीण असेल, असे मत नोंदवले. या गटात याशिवाय इराकचा समावेश आहे.

या स्पर्धेत चिली संघाची मोहीम दि. 8 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्धच्या लढतीने सुरु होईल. स्पर्धेचा इतिहास पाहता, 1993 साली त्यांनी आपल्या पदार्पणात तिसरे स्थान संपादन केले व हीच त्यांची आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. इजिप्तमध्ये 1997 साली झालेल्या आवृत्तीत त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले तर दोन वर्षांपूर्वी घरच्या मैदानात खेळताना अंतिम 16 संघांपर्यंत त्यांना मजल मारता आली होती.