|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणी बसस्थानकात अस्ताव्यस्त पार्किंग

निपाणी बसस्थानकात अस्ताव्यस्त पार्किंग 

प्रतिनिधी / निपाणी

येथील हायटेक बसस्थानकाचे उद्घाटन होऊन वर्ष झाले तरी अद्याप येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आगार प्रशासनाला अपयश आले आहे. याचा येथील बसचालक तसेच व्यावसायिकांनाही फटका बसत असल्याचे दिसत आहे. कारण येथे लावण्यात येणाऱया दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना कोणतीच शिस्त नसल्याने या वाहनांनी बसस्थानकातील अधिकाधिक जागा व्यापल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात अद्याप येथे वाहन पार्किंगचे कंत्राट देण्यात आलेले नाही. आगाराने मध्यंतरी दोनवेळा निविदा मागवल्या. मात्र या निविदेमधील भाडे आकाराचा आकडा मोठा असल्यानेच याला कोणी प्रतिसाद दिलेला नाही.

 सीमावर्ती शहरामुळे दररोज निपाणीत लाखो प्रवाशांची ये-जा असते. यामुळे प्रवाशांच्या गर्दीने येथील हायटेक बसस्थानक सदैव फुललेले दिसून येते. हायटेक बसस्थानकाच्या निर्मितीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. मात्र गेल्या सहा-सात महिन्यांपासून येथे बसस्थानकातच दुचाकी तसेच चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे पार्किंग केली जात आहे. येथील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूस नो पार्किंगचे फलक असतानाही येथे बिनधास्तपणे चारचाकी वाहनांचे पार्किंग होताना दिसत आहे. अनेक या वाहनांचा बसना अडथळा होत असल्याचेही दिसून येते.

आगार प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

आगारातील गाळ्य़ांचे हस्तांतरण होऊन येथे दुकानेही सुरू झाली आहेत. मात्र या दुकानांसमोरच वाहने पार्किंग होत असल्याने याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. तसेच संभाजीराजे चौकात सिग्नल बसवण्यात आल्याने तो सिग्नल चुकवण्यासाठी अनेकदा बसस्थानकातून दुचाकी घातली जाते. या वर्षाच्या सुरुवातीलाच येथे पे अँड पार्कसाठी निविदा मागवण्यात आली होती. मात्र त्यावेळी किमान 26 हजार रुपये मासिक भाडे व भाडय़ाच्या सहा पटीने डिपॉझिट अशी अट ठेवण्यात आल्याने याला शून्य प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुसऱयांदा निविदा मागवतानाही किमान भाडय़ात कोणतीच कपात न केल्याने पुन्हा या निविदेकडे पाठ फिरवण्यात आली. याचा विचार करून भाडे कमी करण्याची गरज असून आता आगार प्रशासन कोणता निर्णय घेते हे पाहणे आवश्यक आहे.

योग्य उपाययोजनांची गरज

पे अँड पार्क सुविधा अद्याप सुरू न केल्याने अनेकदा सरकारी नोकरदार अथवा दूरवर प्रवास करणारे बसस्थानकातच दिवसभर गाडी पार्किंग करून जातात. यामुळेही अनेकदा अडचणी येतात. येथे इच्छूक कंत्राटदारांना वाहन शेड उभारण्यास परवानगी नसल्याने वाहनधारकांचा पै अँड पार्कला कमी प्रतिसाद मिळतो. अशावेळी 26 हजार रुपये भाडे परवडणार कसे? याचा विचार करून किमान भाडय़ात कपात करावी. तसेच अस्ताव्यस्त पार्किंगला योग्य शिस्त लागावी यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.