|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उदयनराजेंच्या दहशतखाली सातारा पोलिस

उदयनराजेंच्या दहशतखाली सातारा पोलिस 

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयात आमदाराच्या घरावर हल्ला होवूनही सातारा पोलिस आमदार शिवेंद्रसिंहराजेच्याच कार्यकर्त्यांना अटक करत सुटले आहेत. उदयनराजे भोसलेच्या एकही कार्यकर्त्यांला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. यावरून सातारा पोलिस हे खासदार उदयनराजेंच्या दहशतीखाली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी एकतर्फी कारवाई त्वरित थांबवली नाही तर माझ्यासह एक हजार कार्यकर्त्यांना अटक करून घेवून जेलभरो आंदोलन करणार असल्याचा ईशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुरूची येथे पत्रकार परिषदेत दिला. तसेच पोलिसांनी जर हे काम जमत नसेल तर खासदार उदयनराजेंना एस. पी करा व एस. पी संदिप पाटलांना खासदार करा, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे केली.

आनेवाडी टोलनाक्यावरून उडालेल्या भडका अद्यापही शांत होणार तयार नाही. पोलिसदलाने सलग दुसऱया दिवशीही सुरूची बंगल्याभोवती कडक पोलिस बंदोबस्त ठेवून अघोषित कर्फ्यु सारखे वातावरण ठेवले आहे. शुक्रवारी रात्री पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून फिर्यादीमध्ये नावे असलेल्या सर्वांना अटक करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते परंतु रात्री उशीरा उदयनराजे गटाच्या पंकज चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर लगेच सोडून दिले. परंतु फिर्यादीत नाव नसता नाही माझे कार्यकर्ते हर्षल चिकणे, प्रतिक शिंदे, चेतन सोळंकी यांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई अशीच एकतर्फी सुरू राहणार असेल तर येत्या दोन दिवसात मी स्वत : हजार कार्यकर्त्यांसह अटक करून घेणार तयार आहे. त्यानंतर होणाऱया परिणामांना मी जबाबदार राहणार नाही. साताऱयात शांतता प्रस्तपित करण्याचा ठेका मी एकटयानेच घेतलेला नाही.

पुरावे आहेत, मग कारवाई का नाही ?

माझ्या घरावर खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री हल्ला केला. त्याचे सीसीटीव्ही फुटेच आहे. ते पुरावे मी पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांना दिले आहेत. तरीही कारवाई करण्याची टाळाटाळ केली जात आहे. माझ्या घरावर हल्ला केला म्हणून जशास तसे उत्तर दिले आहे. परंतु पोलिस यंत्रणा ही उदयनराजेच्या दावणीला बांधली गेली असल्यामुळे कारवाई केली जात नाही.

पोलिसांबरोबर आता संघर्ष करण्याची तयारी

पोलिसांनी एकतर्फी कारवाई थांबवली नाही व उदयनराजेंच्या कार्यकर्त्याना अटक केली नाही तर पोलिसांबरोबर संघर्ष करण्याची आपली व आपल्या कार्यकर्त्यांची तयारी आहे. पोलिस अधिकारी धुमाळ यांना धक्काबुक्की होते तरीही पोलिस बघ्याची भुमिका घेतात हे कितपत योग्य आहे. मी काहीही बंदोबस्त मागवलेल्या नाही त्यामुळे सुरूची येथील बंदोबस्त काढावा. माझे संरक्षण करायला मी व माझे कार्यकर्तै खंबीर असल्याचेही त्यांनी सांगितले. 

एस. पी वर कारवाईची मागणी करणार

मी एक आमदार असुन लोकप्रतिनिधी आहे. माझ्या घरावर हल्ला होवूनही माझ्यावरच कसा गुन्हा दाखल होतो ? हे मला ही कळलेले नाही. तसेच हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे संविधानातील अधिकार मला माहित असून या विरोधात मी हक्कभंगाची कारवाई दाखल करणार असून एस. पी. वर कारवाईची मागणी करणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दुरध्वनीवरून झालेल्या घटनेची पुर्ण माहिती माझ्याकडून घेतली व मी तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले तसेच जिल्हयातील नेत्यांनी ही माझ्यासोबत असल्याचे मला सांगितले आहे. 

एस. पी. हार मानतात का ? वेदांतिकाराजे भोसले

उदयनराजे भोसले यांना चार वेळेस अडवले तरी ते थांबले नाहीत असे सांगणारे एस. पी. संदिप पाटील हे उदयनराजेसमोर हार मानतात का ? असा सवाल वेदांतिकाराजे भोसले यांनी पत्रकारपरिषदेत केला. तसेच तुमच्या घरात एखादा माणुस रात्रीच्या वेळेस घुसला तर काय करणार ? असा प्रश्न ही वेदांतिकाराजेनी पत्रकार व कार्यकर्त्यांना केला. 

दहशतवादी मॅरेथान घेतली तर आयजी साताऱयात येतील

तरूण भारतने प्रकाशित केलेल्या आय जी बाबतच्या वृत्ताचे कौतुक करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, साताऱयात आमदाराच्या घरावर खासदार हल्ला करतो, पण आय जी नांगरे-पाटील साताऱयात फिरकत देखील नाहीत. साताऱयात मॅरेथान, सायकल रॅली मध्ये हिरहीरीने भाग घेणाऱया आय जी नांगरे पाटलांसाठी साताऱयात एखादी दहशतवादी मॅरेथान आयोजित करण्यात आवी मग आय जी साताऱयात येतील असा खोचक टोला ही आमदार शिवेंद्रसिंहराजेनी मारला. 

उदयनराजेंना एस पी करा, अजिंक्य मोहितेंना डी वाय ए पी

उदयनराजे भोसले यांना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत उदयनराजेंना सातारचे एस पी करा व त्यांचे समर्थक अजिंक्य मोहीतेंना डी वाय एस पी करा तर सातारचे एस पी संदिप पाटील यांना खासदार करा असे ही आमदार शिवेंद्रसिंहराजेनी टिका केली.

तसेच मी सहा राऊड फायरिंग अजिंक्य मोहीते वर गाडीत केले असे म्हणणारा अजिंक्य मोहीते हा खरा तर जेम्सबाँड आहे की काय ? असा प्रश्न ही शिवेंद्रसिंहराजे केला व खोटया तक्रारी करण्यात जणू भांडाफोडच केला.

Related posts: