|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी संपावर

सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी संपावर 

प्रतिनिधी /बेळगाव :
सिव्हिल हॉस्पिटलमधील कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. नियमानुसार पगार देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलसमोर या कर्मचाऱयांनी धरणे धरले. मात्र, बिम्स प्रशासनाने त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही.
साफसफाई व इतर कामांसाठी कंत्राटी पद्धतीवर 200 कामगार घेण्यात आले आहेत. मात्र, कामगार पुरविण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. कागदोपत्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 200 कामगार कार्यरत आहेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ 120 डी ग्रुप कर्मचारी कामावर आहेत.
अखिलभारतीय सफाई मजदुर काँग्रेसच्या वतीने पगार वाढीसाठी गेल्या 1 वर्षापासून आंदोलन छेडण्यात आले आहे. महानगर पालिकेतील सफाई कामगारांप्रमाणेच आपल्यालाही दरमहा 14 हजार रुपये पगार मिळावा या मागणीसाठी गुरुवारी धरणे आंदोलन हाती घेण्यात आले आहे.
महेश बनसे, मोहन साखे, संतोष तळ्ळीमनी, बेबी कांबळे, पुंडलीक पालेकर आदींसह 100 हून अधिक कर्मचारी या धरणे आंदोलनात भाग घेतला होता. या कर्मचाऱयांनी दुपारी जिल्हाधिकाऱयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. नियमानुसार पगारवाढ मागणाऱयांना कामावरून काढून टाकण्याची धमकी कंत्राटदार देत आहे, असा आरोपही या कामगारांनी केला आहे.
गुरुवारी तोडगा निघाला नाही म्हणून शुक्रवारीही धरणे धरण्यात येणार आहे. कामगारांच्या आंदोलनामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रुग्णांची नेआन करण्याची वेळ कुटुंबीयांवरच आली आहे. या कामगारांनी दिवसभर धरणे धरले असले तरी बिम्स प्रशासनाने मात्र या आंदोलनाचा आपल्याला काही एक संबंध नाही, अशी भूमीका घेतल्याचे दिसून आले.

Related posts: