|Monday, June 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राजकीय धुमश्चक्री!

राजकीय धुमश्चक्री! 

हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक जाहीर झाली. आता कोणत्याही क्षणी गुजरात विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या जातील. 9 नोव्हे. रोजी हिमाचल प्रदेशात निवडणूक होईल आणि 18 डिसेंबर रोजी मतमोजणी निश्चित केलेली आहे. याचाच अर्थ निवडणूक आयोग गुजरातची निवडणूकदेखील नोव्हेंबरअखेरीस प्रारंभ करील व 14 डिसेंबरपर्यंत संपुष्टात आणेल किंवा एकाच दिवशी गुजरातमधील निवडणूक घेतली जाऊ शकते. निवडणुकीस वेळ आहे खरा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये ठाण मांडले आहे. अलीकडे दोन चार वेळा पंतप्रधानांनी गुजरातमधील अनेक भागात जाऊन वातावरण निर्मिती केली. वस्तुस्थिती अशी आहे ज्या गुजरातमुळे मोदी आज पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले त्या गुजराथींनी मोदींना अत्यंत कठीण प्रसंगी कठीण समयी साथ दिली, तीच गुजराथी मंडळी आज मोदींवर नाराज आहे कारण नोटा बंदी व जीएसटीमुळे अनेकांचे धंदे संपले. अनेक उद्योग आज बंद पडत आहेत. गुजरात म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे ह्रदय असे म्हटले जाते. मोठय़ा प्रमाणात मारवाडी व असंख्य उद्योजकांचे माहेर. अब्जावधींचे व्यवहार या राज्यातून होतात. त्या राज्यातील असंख्य व्यापारी जीएसटी तसेच नोटाबंदीने घातलेली अनेक बंधने यामुळे हातात बेडय़ा पाडल्यागत व्यापाऱयांची अवस्था झाली. परिस्थितीचा पुरेपूर लाभ उठविण्यासाठी कधी नव्हे ते राहुल गांधी गुजरातमध्ये बरेच चमकले. काँग्रेसच्या सभांना मिळत असलेला पाठिंबा लक्षात घेता मोदींनी आपली टीम गुजरातमध्ये वळवली आणि त्यातून गुजरातमध्ये राजकीय रंगत सुरू झाली. वातावरण बरेच तापलेले आहे. अद्याप गुजरातच्या निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. मात्र राहुल गांधी यांनी मोदींच्या या राज्यात ‘विकास वेडा झाला आहे.’ असे निवेदन करून संपूर्ण गुजराथी जनतेला आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केला. नोटाबंदी नंतर अनेक व्यापारी तसेच कर्मचारी व अधिकारी अडचणीत आले. आता निवडणुका जाहीर होणार म्हटल्यानंतर गुजरातमधील खदखदणाऱया असंतोषाचा लाभ उठविण्यासाठी राहुल गांधी यांनी शिस्तबद्धरित्या आराखडा आखला आहे. यामुळेच नेहमीच एकतर्फी किल्ला लढविणाऱया मोदींना सध्या गुजरातमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनाही पाचारण करावे लागले. गुजरातमध्ये निवडणूकपूर्व भाजपला अडचणीत आणण्याच्या सर्व योजना काँग्रेसने आखलेल्या आहेत. त्यातूनच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे सुपुत्र अजय यांच्या कंपनीच्या नफ्यात सोळा हजारपटीने वाढ होणे हा एक आयताच विषय काँग्रेसला सापडला आणि राहुल गांधींनी हे घबाड आणखी प्रभावीपणे मांडून भाजपची गुजरातमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही चांगलीच गोची करून टाकली आहे. त्यातच भाजप नेत्या उमा भारती यांनी गांधी हत्येचा जास्तीत जास्त लाभ काँग्रेसलाच झाला असे निवेदन करून आणखी एका नव्या वादाला वाट करून दिली आहे. या साऱया प्रकाराने सध्या देशातील राजकीय वातावरण बरेच तापू लागले आहे. गुजरातवर भाजपची सारी भिस्त आहे. जीएसटीमुळे जेरीस आलेली मंडळी यावेळी गप्प बसतील, असे वाटत नाही. जीएसटीने सर्वसामान्य व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे व जनतेमध्ये असलेल्या अस्वस्थतेमुळे गुजरात निवडणुकीच्यापूर्वी गेल्याच आठवडय़ात काही प्रमाणात व्यापारी वर्गाला तसेच सर्वसामान्य जनतेला सूट देण्यात आली. त्यातून वातावरण किंचित निवळणार मात्र जीएसटीमुळे सर्वसामान्यांपासून मोठय़ा व्यापारी वर्गाच्या अडचणी वाढत आहेत. जगात ज्या देशांनी अशी पद्धत अवलंबली ती जवळपास सर्वत्रच फोल ठरली. भारतात मात्र मारून मुटकून ही योजना यशस्वी करण्याचा मोदी सरकार प्रयत्न करीत आहे. गुजरात व हिमाचल प्रदेशात डिसेंबरपर्यंत निवडणुका होतील. भाजपने निवडणूक आयोगाला डिसेंबर 14 ते जानेवारी 14 या दरम्यान निवडणुका घ्या, अशी विनंती केल्यामुळे आयोगाने केवळ हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर केली व गुजरातला हात लावलेला नाही, परंतु 9 नोव्हेंबर रोजी हिमाचलची निवडणूक होईल व मतमोजणी तब्बल सव्वा महिन्यांनी म्हणजेच 18 डिसेंबर रोजी होईल, असे जाहीर करण्यामागील उद्देश एवढाच की, 16 डिसेंबरपर्यंत गुजरातची निवडणूक होईल. भाजप-काँग्रेस दरम्यान ज्या आरोपांच्या फैरी झडत आहेत व ज्या पद्धतीने एकमेकांविरुद्धच्या तोफांची धडधड पाहता या दोन्ही निवडणुका महत्त्वपूर्ण आहेत. गुजरातमध्ये गेली 17 वर्षे भाजपची एकहाती सत्ता आहे. त्याठिकाणी काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपला आव्हान दिले आहे. भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. सारा देश भाजपच्या विरोधात गेला तेव्हा भाजपला गुजरातने तारलेले आहे. गुजरात हा पंतप्रधान मोदींचा बालेकिल्ला किंवा तळ आहे आणि हा किल्ला काँग्रेसने उद्ध्वस्त केला तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी ‘बुरे दिन’ येण्याची शक्यता आहे. साऱया देशाचे राजकीय समीकरण हे एका गुजरातवर अवलंबून आहे. भाजपचा प्रधानमंत्री चेहरा गुजरातचा. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा चेहराही गुजरातचा आहे. त्यामुळे गुजरातमध्ये एवढय़ा वर्षातील निवडणुकीपेक्षा आताच्या निवडणुकीत भाजपसाठी ‘करो या मरो’ अशी अवस्था ठरणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला अच्छे दिन येऊ शकतात. सध्या या राज्यावर काँग्रेसचा झेंडा फडकत आहे. भाजपने तिथे चांगलीच पकड घेतलेली दिसते. मात्र गुजरातबाबत पूर्वीसारखे आज कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. राहुल गांधींना मात्र प्रचंड हुरुप व उत्साह आलेला पाहता ऐन निवडणुकीत हा उत्साह तसाच टिकणार का हा प्रश्न आहे. निवडणुका राज्यांच्या विधानसभेच्या मात्र भवितव्य ठरविणार दीड वर्षांनंतर होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीचे! गुजरात निवडणूक ही खरेतर भाजप व मोदींसाठीची सत्त्वपरीक्षा आहे. गुजराती मंडळी झाले गेले विसरून पुन्हा मोदींना साथ देतील का, हा प्रश्न पुढील दोन महिने चर्चिला जाईल. तूर्तास निवडणूकपूर्व तापलेल्या वातावरणाने राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे!