धावत्या रूग्णवाहिकेत जन्मलेल्या ‘त्या’ तिन्ही बालकांचा मृत्यू

प्रतिनिधी /देवरुख
धावत्या रुग्णवाहिकेतच जन्म झालेल्या तिन्हीही बालकांचा कोल्हापूर येथे उपचार सुरु असताना शुक्रवारी मृत्यू झाला. कमी वजनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. साखरपा परिसरातून या प्रकाराबाबत हळहळ व्यक्त होत आहे.
साखरपानजीकच्या दख्खन गावातील प्रणाली विलास जाधव या महिलेने धावत्या रुग्णवाहिकेतच 3 मुलांना जन्म दिल्याची घटना बुधवारी घडली होती. यानंतर या महिलेला व बाळांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बालकांचे वजन कमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गुरुवारी कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते.
मात्र शुक्रवारी या तिन्ही मुलांचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. एक बाळ 700 ग्रॅम, दुसरे बाळ 750 ग्रॅम, तिसरे बाळ 900 ग्रॅम वजनाचे होते. ही बाळे कमी वजनाची असल्यानेच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असून तिच्यावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या महिलेवर उपचार करुन तिला शनिवारी घरी सोडण्यात आले आहे.
स्त्रिरोग तज्ञाची चौकशी करणारः डॉ. देवकर
पाली ग्रामीण रुग्णालयात स्त्रिरोगतज्ञ आहे. तरीही त्या महिलेला प्रसुतीसाठी रत्नागिरीत का पाठवण्यात आले, तेथील स्त्रिरोग तज्ञ कुठे गेले होते, याची चौकशी करण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी सांगितले. मुळात या महिलेला पाली रुग्णालयात दाखल करुन घेणे गरजेचे होते. रुग्णवाहिकेत प्रसुती होण्यापेक्षा रुग्णालयात झाली असती तर अधिक बरे झाले असते, असे ते म्हणाले.