|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘गाव कारभारी’ आज ठरणार

‘गाव कारभारी’ आज ठरणार 

ग्रा. प. साठी जिल्हय़ात सुमारे 70 टक्के मतदान

प्रथमच सरपंचपदाची थेट निवडणूक

2441 उमेदवारांचा होणार आज फैसला

दुपारपर्यत चित्र स्पष्ट होणार

प्रतिनिधी /रत्नागिरी

प्रथमच होत असलेल्या थेट सरपंचपदासह 215 ग्रामपंचायतीसाठी सोमवारी जिल्हय़ात सुमारे 70 टक्के मतदान झाले. 73 सरपंच व अनेक सदस्य यापुर्वी बिनविरोध निवडून आले असून 141 सरपंच व उर्वरीत सदस्यांसांसाठी 2441 उमेदवार भाग्य अजमावत आहेत. आपले ‘गाव कारभारी’ कोण असतील याचा कौल मतदारांनी सोमवारी मतदानयंत्रात बंद केला असून मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहुर्तावर कोणाचे फटाके फुटणार याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हय़ातील 473 मतदान केंद्रांवर सोमवारी ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सोमवारी सकाळी 7.30 ते 5.30 या कालावधीत मतदान झाले. चिपळुण, मंडणगड, गुहागर येथे मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार सोडता कोणत्याही अनुचित प्रकाराविना मतदान सर्वत्र शांततेत पार पडले.

यावेळी प्रथमच थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने गाव पातळीवर लढवली जाणारी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. राजकीय पक्षाच्या चिन्हावर जरी निवडणूक लढवली जात नसली तरी सर्वच पक्षांनी सरपंचपदावर लक्ष केंद्रीत केल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. सध्या बहुतेक ग्रामपंचयतींवर शिवसेनेचे व त्याखालोखाल राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळणार की मतदार अन्य पक्षांच्या बाजूने कौल देणार याचा फैसला मंगळवारी होणाऱया मतमोजणीदरम्यान होणार आहे.

चिपळुणात 75 टक्के मतदान

चिपळूण तालुक्यातील 32 पैकी 19 ग्रामपंचायतीसाठी सोमवारी सुमारे 75 टक्के मतदान झाले. यामध्ये सरपंचपदाच्या 15 तर सदस्यांच्या 98 जागांचा समावेश आहे. गुढे येथील यंत्र बंद पडल्याची घटना वगळता 53 केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. राजकीयदृष्टय़ा महत्वाच्या असलेल्या कामथे व शिरगाव येथे मतदान प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी विशेष लक्ष ठेऊन होते. मंगळवारी सकाळी 10.30 वाजता बांदल हायस्कूलच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. त्यासाठी 8 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

दापोलीत सरासरी 70 टक्के मतदान

दापोली तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत सरासरी 70 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. येथे 294 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात सरपंचपदाकरिता 43 जणांचे भवितव्य सोमवारी मशिनबंद झाले आहे.

खेडमध्ये दुपारपर्यत 68 टक्के मतदान

खेड तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी रिंगणात उतरलेल्या 29, तर सदस्यपदासाठीच्या 139 उमेदवारांचे राजकीय भवितव्य सोमवारी मतदान यंत्रात बंद झाले. 11 वाजेपर्यंत अवघे 38 टक्केच मतदान झाले होते. दुपारच्या सत्रात मात्र मतदारांचा उत्साह दिसून आला त्यामुळे 68 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मंडणगडमध्ये 67 टक्के मतदान

मंडणगड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्य निवडीसाठी तालुक्यातील 42 केंद्रांवर तालुक्यात 67.30 टक्के इतके सरासरी मतदान झाले. देव्हारे, नायणे, विन्हे व दुधेरे-बामणघर येथील मतदान केंद्रांवर मतदानाच्या मशीन्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने व मशीन्स नादुरुस्त झाल्याने मतदानासाठी आलेल्या नागरिकांना मतदान केंद्रांवर काही काळासाठी रांगेमध्ये तिष्ठत उभे रहावे लागले.

गुहागरमध्ये 70 टक्के मतदान

तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींपैकी 15 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी सरासरी 70 टक्के मतदान झाले. मात्र सडेजांभारी ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 मधील मतदान यंत्र बंद पडल्याची घटना घडली. 21 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 15 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबवावी लागली.

रत्नागिरीत 68 टक्के मतदान

तालुक्यातील 29 पैकी 21 ग्रामपंचायतीसाठी सोमवारी सुमारे 65 टक्के मतदान झाले. तालुक्यात 8 सरपंच बिनविरोध झाले असून उर्वरित 21 पदांसाठी 51 उमेदवार रिंगणात आहेत. 72 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले.

राजापूरात 69 टक्के

राजापूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींसाठी सुमारे 62 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत सरपंचपदासाठी 49 उमेदवार तर सदस्यपदासाठी 177 उमेदवार रिंगणात आहेत.

संगमेश्वरात 68 टक्के

संगमेश्वर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या 90 सदस्य पदांसाठी 183 तर 20 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 51 जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. तालुक्यात सायं. 4 वाजेपर्यंत 61.09 टक्के मतदान झाले होते.

लांजात 74 टक्के

लांजा तालुक्यात 19 पैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 16 सरपंचपदासाठी 65 तर सदस्यपदासाठी 240 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मतदानयंत्रात बंद झाला आहे. तालुक्यात सुमारे 74 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

निकालाकडे लक्ष

ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांसाठी सोमवारी झालेल्या मतदानाचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. मतमोजणीसाठ प्रशासनाने जय्यत तयारी केली असून मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. मंगळारी सकाळी 10 वाजता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला प्रारंभ होईल. सरपंच व सदस्य या सर्व उमेदवारांची एकत्रित मतमोजणी प्रकिया होणार आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व निकाल घोषीत होतील अशी अपेक्षा आहे.

Related posts: