|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सोनगिरी-टाकळेवाडी येथे भानामतीचा प्रकार

सोनगिरी-टाकळेवाडी येथे भानामतीचा प्रकार 

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचा निष्कर्ष

घरातील कपडे, वस्तू अचानक पेट घेत असल्याचा प्रकार

वार्ताहर /संगमेश्वर

तालुक्यातील सोनगिरी टाकळेवाडी येथील सुभाष यशवंत टाकळे यांच्या घरात गेले 13 दिवस घरातील कपडे व अन्य वस्तु अचानक पेट घेण्याचा प्रकार घडत आहे. अचानक कपडे पेट घेतल्याने टाकळे कुटुंबिय हतबल झाले आहेत. हा प्रकार रत्नागिरी येथील अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी घराची पहाणी केली असता हा भानामतीचा प्रकार असल्याचे सांगितले. तसेच यामध्ये घरातीलच एखादी व्यक्ती सहभागी असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगिरी येथून 3 कि.मी अंतरावर टाकळेवाडीत सुभाष यशवंत टाकळे यांचे घर आहे .ते पत्नी सुप्रिया (45), मुलगा विक्रांत (24) व सून मृणाली (22) यांच्या सोबत राहतात. सुभाष हा शेतकरी असून मुलगा विक्रांत मुंबईत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. दसऱया पूर्वी विक्रांत गावी आल्यानंतर 5 ऑक्टोंबर रोजी सकाळच्या दरम्याने टाकळे यांच्या घरातील पलंगाला अचानक आग लागली ही आग विक्रांतने पाहिली व आटोक्यात आणली. यावेळी सुभाष कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने मुलाने ही हकीकत त्यांना फोनवर कळवली. त्याचबरोबर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विष्णू टाकळे घराला कुलूप घालून शेतात गेले असताना घरातील लोंखडी बेडवरील गाद्यांना आग लागून धूर येवू लागला. धूराचे लोट पाहून विष्णू यशवंत टाकळे यांनी त्यांच्या पत्नीला कळवले व माळयावरुन घरात येऊन त्यांनी ही आग स्वतः आटोक्यात आणली. 6 ऑक्टोबर सुभाष हे मुलासह डॉक्टरकडे गेले होते. यावेळी त्यांची पत्नीही घरी नव्हती. घरी एकटयाच असलेल्या सुनेला कपाटातून धूर येताना दिसला. तीने ही हकीकत विष्णू यांना कळवली. त्यानंतर आग आटोक्यात आणली. यानंतर त्याच दिवशी दुपारी घरातील कपडयांच्या सुटकेसला अचानक आग लागली. त्याच दिवशी दांडीवर वाळत घातलेले कपडेही अर्धवट स्थितीत जळलेले आढळले. यानंतर दररोज आगीच्या घटना घडतच होत्या. एकी दिवशी सून दरवाज्यात उभी असताना तीच्या अंगावरील गाऊन अचानक पेटला. रात्री चुलीतील लाकडे विझवून ठेवलेली असताना दुसऱया दिवशी चुलीच्या एका बाजुला यातील एक लाकूड जळत असलेले सापडले. टिव्हीवरचे कव्हर जळले आणि त्यांची झळ टिव्हीलाही बसली. दुसऱया दिवशी घराबाहेर वाळत घातलेले कपडे जळलेले आढळले मात्र बाजुच्या घरातील माणसांचे कपडे व्यवस्थित होते. एकूण 5 दिवसात असे प्रकार अकरा वेळा घडले आहेत. कुटूंबियांचा बरासचा संसार यात जळून खाक झाला आहे. आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी त्यांच्याकडे कपडेच न राहिल्याने कोळंबे येथील अमोल पाटणे व सोनगिरी येथील काही ग्रामस्थांनी टाकळे कुटूंबियांनी कपडे व काही साहित्य मदत म्हणून दिली. आगीचे प्रकार शॉर्ट सर्किटने न होता अन्य कोणत्याही ज्वालाग्राही पदार्थानी होत नसताना अथवा बाहेरील कोणी व्यक्ती घरात माणसे वावरताना हे करेल अशी शक्यता नसल्याने नेमका हा काय प्रकार आहे याबाबत गावामध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. मात्र चारही माणसे रात्री झोपल्यानंतर आगीची घटना घडली नसल्याने हा प्रकार भानामतीचा असल्याचा दावा अंनिसने आज या घराची पहाणी केल्यानंतर केला आहे.

टाकळे यांच्या घरातील कपडे जळण्याचा हा प्रकार भानामतीचा

सुभाष टाकळे यांच्या घरातील आगीचा हा प्रकार हा देवदेवस्किचा विषय नसून तो भानामतीचा प्रकार असल्याचे अंनिसचे कार्यकर्ते विजय पवार, उदय पवार, विनायक गावडे, योगेश पवार यांनी केला आहे. सुभाष टाकळे यांच्या घरात 5 ऑक्टोंबरपासून कपडयांना आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. हा प्रकार काय आहे हे पहाण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते सोनगिरी टाकळेवाडी येथे गेले होते. भानामती म्हणजे आधुनिक तंत्राचा वापर करून एखादा विचित्र प्रकार घडवून आणायचा त्यासाठी विशिष्ठ जागा निवडायची आणि सर्वांसमोर हा प्रकार भानामतीचा आहे असा विषय करायचा.

अंनिसने व्यक्त केलेल्या मतांवर प्रतिक्रिया देताना ग्रामस्थ विनेश टाकळे म्हणाला की सुरुवातीला मला पण यावर विश्वास बसला नाही हा प्रकार मुद्दामहून घडवून आणला जातो की काय असा संशय मला होता. मात्र वाडीतील लोकांसमोर सुटकेस जळाली, टिव्ही पेटला, ग्रीन नेट जळला आतील पलंग जळला, बाहेरील कपडे जळले हे प्रकार मी येथे असताना घडले आहेत. त्यामुळे मला यावर विश्वास ठेवावा लागत आहे. या प्रकारातील सत्य बाहेर काढण्यासाठी आपणही मदत करु, अशी ग्वाही त्यांनी अंनिसला दिली.

Related posts: