|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » समभावाच्या दीपांनी उजळतेय दिवाळी

समभावाच्या दीपांनी उजळतेय दिवाळी 

राधिका सांबरेकर/ बेळगाव

मांगल्य आणि तेजाचे प्रतीक म्हणजे दिवाळी. आनंद आणि उत्साहाचे समीकरण म्हणजे दिवाळी. मात्र या सर्व गोष्टी एकाच धर्मापुरत्या मर्यादित असाव्यात, असा काही नियम नाही. आणि म्हणूनच गणेशपूरच्या धामणेकर या मुस्लीम कुटुंबात दीपोत्सव साजरा करण्याचा प्रघात वर्षानुवर्षे जपला जातो. म्हणूनच समभावाच्या व सद्भावनेच्या दीपांचे तेज उजळून निघते तेव्हाच खऱया अर्थाने दीपोत्सव साजरा होतो.

आनंद… हर्षोल्हास… ओसंडता उत्साह… रंगांची उधळण… सुखसमृद्धीची पहाट म्हणजे दिवाळी. हिंदु धर्मियांचा वर्षातील हा सर्वात मोठा सण. हिंदु संस्कृतीनुसार हा सण म्हणजे उजळली घरे… तेजाळली मने अशा स्वरुपाचाच. मात्र हिंदु-मुस्लीम ऐक्य जपत तेजोमय अन् चैतन्याची दीपावली मुस्लीम बांधवांतर्फेदेखील साजरी केली जात आहे. ममता अकबर धामणेकर (बेळगावकर) या मुस्लीम कुटुंबात 4 पिढय़ांपासून दिवाळी सण साजरा केला जात आहे. रांगोळी, किल्ला, घराची सजावट, फराळ अशा सर्वच बाबी दिवाळी सणाच्या निमित्ताने केल्या जातात. गणेशपूर येथील या कुटुंबाकडून हा वारसा पुढे जपला जात आहे.

गणेशपूर येथील धामणेकर कुटुंबीयांतर्फे आगळी वेगळी दिवाळी साजरी केली जात आहे. गल्लीत सर्वच जण मराठी समाजबांधव असल्याने पूर्वीपासूनच दिवाळी सण साजरा केला जात असून घराण्याची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न कुटुंबीय करत आहे. व्यवसायाने पेंटर असणारे अकबर धामणेकर यांच्या पत्नी ममता धामणेकर, मुले शबदर व साहिल धामणेकर तसेच मुलगी फिजा धामणेकर हे कुटुंबातील सर्व सदस्य दिवाळी सणाचा आनंद हिंदु समाजबांधवांप्रमाणे घेत आहेत. पहाटे उठून रेखाटलेली रांगोळी तसेच घराला केलेली विद्युत रोषणाई, घराजवळच केलेला किल्ला हे सारे दृश्य हिंदुंनी साजऱया केलेल्या दिवाळी सणाइतकेच आणि रमजान या पवित्र सणाइतकेच त्यांना आनंदाचे वाटत आहे.

किल्ल्याचे वेगळेपण…

शिवरायांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे विविध किल्ले या कुटुंबातर्फे साकारण्यात आले आहेत. गल्लीतील मुलांच्या मदतीने साहिल दिवाळी सणाच्या आठ दिवस आधी किल्ला बनविण्याच्या कामाला लागतो. यावर्षी साकारण्यात आलेल्या किल्ल्यात लक्ष्मी मंदिर, दुर्गा मंदिराबरोबरच दर्गादेखील साकारण्यात आली आहे. यामुळे हिंदु-मुस्लीम भाई-भाई असा संदेश या किल्ल्यातून देण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. तटबंदी, गुहा, तलाव तसेच गुप्त स्थळे अशा वैशिष्टय़पूर्ण बाबी यामध्ये साकारण्यात आल्या असून सिंहासनावर विराजमान शिवरायांचा पुतळा तसेच मावळे, सैनिक, प्राणी, पक्षी यांची अचूक मांडणी करण्यात आली आहे. यामुळे हा किल्ला आकर्षक आणि शिवरायांनी दिलेल्या एकात्मता, समता या शिकवणीची आठवण करून देणारा ठरतो आहे.

दिवाळी सणाचे वेगळेपण…

दिवाळी सणात पाचही दिवस उत्साही वातावरण असते. या कुटुंबातर्फे पहाटे उठणे, स्नान करणे, गोडधोड पदार्थ बनविणे अशा प्रकारे दिवाळी साजरी केली जात आहे. विशेषतः दिवाळी पाडवादेखील या कुटुंबातर्फे साजरा करण्यात येतो. ममता धामणेकर यांचे आई-वडील दस्तगीर बेळगावकर व शरीफा बेळगावकर यांची जनावरे असल्याने त्या स्वतः आई-वडील आणि भाऊदेखील पाडवा उत्साहात साजरा करतात. पाहुण्यांना गोड जेवणासाठी आमंत्रण देऊन हा आनंद ते द्विगुणीत करतात. जनावरांची पूजा करण्याची परंपरा गवळी समाजाप्रमाणेच ते जोपासत आहेत. जनावरे सजविणे, त्यांची मिरवणूक काढणे आणि त्यांना पोळीचा नैवेद्य दाखविणे ही संस्कृती या कुटुंबातर्फे जोपासली जात आहे.

दिवाळीबरोबरच इतर सणांचा आनंद

दिवाळीबरोबरच गणेश चतुर्थी, नवरात्र, श्रावणमास या सणांचेही महत्त्व या कुटुंबातर्फे जपण्यात येते. गणेश चतुर्थीमध्ये गल्लीत मंडळातर्फे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. यामुळे मंडळात आरतीला जाणे, रांगोळी काढणे तसेच गणपती मंदिराची आरास करणे ही सर्व कामे कुटुंबातील पाचही सदस्य मोठय़ा मनाने करतात. याबरोबरच नवरात्रोत्सवात दौडीच्या निमित्ताने पाना-फुलांची रांगोळीदेखील काढली जाते आणि दौडीचे स्वागत केले जाते. विशेषत: श्रावण महिन्यात घर स्वच्छ करणे, श्रावण सोमवारी गोड पक्वान्न बनविणे याबरोबरच महिनाभर मांसाहार वर्ज्य करून मुस्लीम असूनही हिंदुत्व आणि पावित्र्य जपण्याचा प्रयत्न या कुटुंबीयांतर्फे केला जातो.

जणू आमचीच दिवाळी…

दिवाळी सणाचा गोडवा गल्लीतील मराठी बांधवांतर्फे मिळतो. दिवाळीत सर्व परंपरा पार पाडल्या जात आहेत, मात्र फराळ बनवत नाही. कारण गल्लीतील हिंदुबांधव दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सर्वजण फराळ देतात. यामुळे जणू आमचीच दिवाळी असल्याचा अनुभव येतो. चकली, चिवडा, करंजी हा फराळ आम्ही आवडीने खातो. रमजान ईद, बकरी ईद, मोहरम या सणांच्या निमित्ताने शिरखुर्मा तसेच चवडे बनवून गल्लीत सर्वांना देऊन बंधूता जपण्यात येते. येथील समाजबांधवदेखील सणाच्या शुभेच्छा देऊन शिरखुर्मा आवडीने पितात. यामुळे आम्ही या सर्वांपेक्षा वेगळे नाहीच. शिवाय सर्व सण सारखेच असून मानवता हा एकच धर्म असल्याची जाणीव यामुळे वृद्धिंगत होते, अशी माहिती धामणेकर कुटुंबीयांनी दिली.

Related posts: