|Sunday, August 25, 2019
You are here: Home » विविधा » पुण्यात संदीप-सलीलने रंगवली दिवाळी पहाट

पुण्यात संदीप-सलीलने रंगवली दिवाळी पहाट 

पुणे / प्रतिनिधी

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही….;चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही…., दूर दूर नभपार, डोंगराच्या माथ्यावर…,अगंबाई ढगोबाई….अशी एकाहून एक गाणी सादर करीत संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी गुरुवारी रसिकांची मने जिंकली.

निमित्त होते स्व. आमदार शिवाजीराव भोसले प्रतिष्ठानतर्फे दिवाळी पहाटनिमित्त आयोजिलेल्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाचे.

संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी ‘जरा चुकीचे, जरा बरोबर’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर ‘दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर…’, ‘अगंबाई ढग्गोबाई’ अशी गाणी सादर करीत त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. परिस्थितीमुळे आई-वडिलांना नोकरी करावी लागते, त्या मुलांवर आलेल्या एकाकीपणाची अवस्था दर्शविणारी ‘दूर देशी गेला बाबा, गेली आई कामावर’ या गीतातून सादर करत रसिकांना त्यांनी हेलावून सोडले. तर ‘राती अर्ध्या राती’ ही लावणी सादर करत रसिकांना ठेका धरायला लावला. उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला.

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा; सेल्फीचा मोह टाळा

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा, सेल्फीचा मोह टाळा, असा संदेश कवी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने दिला. कार्यक्रमात त्यांनी सेल्फीपासून आलेले अनुभव आणि काही आठवणीही सांगितल्या.