|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » संभाजीनगर येथे कावीळीची 3 तिघांना लागण

संभाजीनगर येथे कावीळीची 3 तिघांना लागण 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरालगत असणाऱयां संभाजीनगर येथील उपनगरातील नागरिकांना दूषित पाण्यामुळे कावीळ झाली असल्याचे समोर आले आहे. रविवारी आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर तिघांना काविळीची लागण झाली असून अन्य दोन संशयित आढळून आले. असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान संभाजीनगर येथे काविळीची साथ पसरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सातारा शहरालगत असणाऱया त्रिशंकू भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, प्राधिकरणाच्या कारभारामुळे येथील नागरिकांना अनेक साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्याचा फटका गेल्या दोन दिवसांपासून संभाजीनगर आणि आजूबाजूच्या काही उपनगरांना बसू लागला आहे. अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्याची तक्रार केल्यानंतरही दुरूस्ती केली जात नाही. काही दिंवसापूर्वी बारावकरनगरमध्ये जलवाहिनी दुरूस्त करण्यासाठी खड्डा खोदला होता. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर त्यांची नाममात्र दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र, या खड्डयात आजूबाजूच्या गटारातील पाणी झिरपत असल्याने ते पाणी पुन्हा लोकांच्या घरामध्ये येत होते. संभाजीनगर परिसरात काळपट आणि दुर्गंधी असणारे पाणी घरांमध्ये येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी होती. त्यानुसार याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला देण्यात आल्यानंतर रविवारी त्या अनुषंगाने या परिसराची पाहणी करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कारखानीस, चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहा पथकांनी 2 हजार 659 लोकांची तपासणी केली. या तपासणीत काविळीचे तीन रूग्ण, तर दोन संशयित आढळून असल्याचे डॉ. कारखानीस यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, आरोग्य तपासणी सुरू असतानाच जीवन प्राधिकरणाकडून गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तीन तासांच्या अथक परिश्रमातून गळती काढण्याचे काम पूर्ण झाले. जेथून या परिसराला पाणीपुरवठा करण्यात येतो, ती पाईप बंद करण्यात आली असून दुसरी पाईपही दुरूस्त करण्यात येणार आहे.

 

Related posts: