|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पुस्तकाचे प्राक्तन

पुस्तकाचे प्राक्तन 

एकेक पुस्तक – म्हणजे कोणत्याही चांगल्या पुस्तकाची एकेक प्रत आपले नशीब घेऊन येते.

एका संस्कृत सुभाषितात पुस्तकाची आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचे तेलापासून, पाण्यापासून, सैल बांधणीपासून आणि मूर्खापासून रक्षण करावे. मूर्खापासून रक्षण. हे तर फारच जिकरीचे काम.

हौशी आणि नवशिके लेखक अनेकदा आपले लेखन स्वतः खर्च करून छापतात. प्रत्येक लेखकाला वाटते तसे त्यांना देखील आपले लेखन मौलिक वाटत असते. छापलेली थोडी पुस्तके विकली जातात. उरलेल्या प्रती पडून राहतात आणि केव्हातरी रद्दीत किंवा नुसत्याच फेकून द्याव्या लागतात. तेव्हा त्या लेखकांना यातना होतात. पैसे वाया गेल्याच्या यातना नव्हेत तर लेखनाचे चीज न झाल्याच्या यातना.

विश्राम बेडेकरांच्या ‘रणांगण’बाबत वाचलेला किस्सा. रणांगणच्या काही प्रती कोणा व्यापाऱयाने घेतल्या होत्या आणि दुसऱया महायुद्धात जखमी सैनिकांवर उपचार करणाऱया रुग्णालयांना जे सामान पुरवायचे त्याचे टेंडर भरताना सामानाच्या यादीत पुस्तक समाविष्ट केले होते. रुग्णाच्या प्रत्येक खाटेबरोबर एकेक प्रत.  

पुस्तकाचे प्राक्तन आणखीन एका प्रसंगी जाणवते. कधी कधी आपल्या संग्रहात एखादे चांगले पुस्तक असते. त्या पुस्तकाची तीच विशिष्ट प्रत आपल्यासाठी मौल्यवान असते. पुस्तकातल्या एखाद्या पानावर, एखाद्या प्रसंगापाशी किंवा कवितेच्या ओळीवर आपण खूण केलेली असते. तिथे एखादी हळवी आठवण चिकटलेली असते. जी फक्त आपल्यालाच ठाऊक असते. आपल्या पश्चात पुस्तकाची ती प्रत हरवते किंवा खराब होते तेव्हा त्याच पुस्तकाची नवी प्रत आणली तरी दु:खाची भरपाई होत नाही.   

अर्नेस्ट हेमिंग्वे या लेखकाची ‘अ फेअरवेल टू आर्म्स’ ही एक प्रसिद्ध कादंबरी. या कादंबरीचा नायक प्रेडरिक हेन्री अमेरिकन फौजेच्या वतीने इटलीमध्ये असताना त्याची कॅथरिन नावाच्या परिचारिकेशी ओळख होते. आधी तो तिच्यामध्ये गुंतलेला नसतो, नुसताच खडा टाकून बघतो. पण हळूहळू तिच्यात गुंतत जातो. त्यांची मैत्री अतिशय हळूहळू प्रेमात परिणत होते. त्यांच्यावर संकटे येतात. प्रेडरिकला अटक होणार असते. पण एका छोटय़ा बोटीतून दोघे स्वित्झर्लंडला पलायन करतात. तिथे एका रुग्णालयात कॅथरिनची प्रसूती होत असताना आधी तिच्या पोटातले बाळ आणि थोडय़ा वेळाने तिचे निधन होते.

या कादंबरीमध्ये अनेक पानांवर मी अशा अदृश्य खुणा करून ठेवल्या आहेत. आणि तिची प्रत जपलेली आहे.

Related posts: