|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बालविकास विभागासाठी 87 लाख रुपयांची तरतूद

बालविकास विभागासाठी 87 लाख रुपयांची तरतूद 

जि.प.महिला बालविकास समिती सभा

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी

 जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागासाठी 86 लाख 84 हजार रु. तरतूद सुधारित अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामध्ये 50 टक्के निधी प्रशिक्षणावर तर 50 टक्के निधी योजनांवर खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ते परिपूर्ण प्रस्ताव घ्यावेत, असे आदेश सभापती सायली सावंत यांनी गुरुवारी झालेल्या महिला व बालविकास समिती सभेत दिले.

जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची सभा सभापती सायली सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, सदस्य श्वेता कोरगावकर, माधुरी बांदेकर, वर्षा कुडाळकर, शर्वरी गावकर, राजलक्ष्मी डिचवलकर, संपदा देसाई, पल्लवी राऊळ आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महिला बालविकास विभागाच्या प्रस्तावित सुधारित अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आले. यामध्ये विविध प्रशिक्षण योजनांमध्ये संगणक दुरुस्ती, एम.एस.सी.आय.टी., फॅशन डिझायनींग, ब्युटीपार्लर, परिचारीका प्रशिक्षण टायपिंग, फळप्रक्रिया प्रशिक्षण, कराटे प्रशिक्षण आदी प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक त्या निधींची तरतूद करण्यात आली आहे. निधी उपलब्धतेनुसार प्रस्ताव निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्तावही मागविण्यात आले आहेत. यामध्ये एम.एस.सी.आय.टी. प्रशिक्षणासाठी आतापर्यंत 156 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. कराटे प्रशिक्षणासाठी आतापर्यंत 781 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. कराटे प्रशिक्षणासाठी 600 प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहेत.

जिल्हय़ात 534 अंगणवाडय़ांना स्वत:च्या इमारती नाहीत

जिल्हय़ातील एकूण 1196 अंगणवाडय़ांपैकी अद्यापही 534 अंगणवाडय़ांना स्वत:च्या इमारती नाहीत. काही अंगणवाडय़ा शाळा इमारतीत तर काही खासगी इमारतीत भाडय़ाच्या जागेत सुरू असल्याची माहिती सभेत देण्यात आली. या बाबतचा तालुकानिहाय आढावा घेत ज्या ठिकाणी शाळेची वर्गखोली उपलब्ध होऊ शकेल. अशा ठिकाणी अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करा. या बाबतचा तालुकानिहाय अहवाल सादर करा, अशी सूचना यावेळी सोमनाथ रसाळ यांनी केली.

Related posts: