|Monday, January 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भारत आणि अफगाणिस्तान

भारत आणि अफगाणिस्तान 

नुकताच अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रेक्स टिलरसन यांचा भारत दौरा संपला. या दौऱयात भारताच्या अफगाणिस्तानमधील भूमिकेसंबंधी बराच खल झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानिमित्ताने भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधांना उजाळा मिळाला आहे. परिणामी, अफगाणिस्तान हा देश काय आहे आणि भारताच्या दृष्टीने त्याचे महत्त्व काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक ठरते. अफगाणिस्तान हा देश आंतरराष्ट्रीय राजकीय अभ्यासकांसाठी इतिहास काळापासून एक गूढ आहे. या देशाचा धर्म इस्लाम असला तरी विविध जमाती पूर्वापारपासून आपले गुणधर्म टिकवून आहेत आणि त्यांच्यातील आंतर्विरोध आणि त्यातून निर्माण होणारे हिंसक संघर्ष त्या देशाच्या पाचवीलाच पूजले आहेत. भारताचे या देशाशी इतिहासकाळापासून घनिष्ठ संबंध आहेत. महाभारतातील धृतराष्ट्राची पत्नी गांधारी ही सध्याच्या अफगाणिस्तानातील होती, असे म्हटले जाते. बौद्ध धर्माच्या स्थापनेपूर्वी तेथे हिंदू राजांचे राज्य होते अशा ऐतिहासिक नोंदी सापडतात. बौद्ध धर्माच्या स्थापनेनंतर तेथे या धर्माचाही चांगल्या प्रकारे प्रसार झाला. गौतम बुद्धाची अनेक शिल्पे तेथे सापडतात. सुमारे 13 शे वर्षांपूर्वी इस्लामच्या आक्रमणानंतर या देशातील बहुसंख्य जमाती मुस्लीम झाल्या. तेव्हापासून या देशाची एक मुस्लीम देश म्हणून ओळख आहे. अफगाणिस्तानातील जमातींचे वैशिष्टय़ असे की त्यांनी कधीही परकियांची सत्ता सहन केली नाही. हा देश ताब्यात घेण्याचा प्रयत्न ब्रिटीशांनीही केला पण त्यात त्यांना अपयश आले. अशा प्रकारे आपले वेगळे सांस्कृतिक वैशिष्टय़ नेहमी जपणारा प्रदेश अशी याची ख्याती आहे. 1977 पूर्वी या देशात आताच्या तुलनेत बरेच शांततेचे वातावरण होते. तरीही डावे गट आणि कट्टर धार्मिक गट यांच्यात संघर्षाचे वातावरण होते. 1979 मध्ये रशियाने या देशावर आक्रमण करून त्याचा ताबा घेतला. या घटनेने केवळ अफगाणिस्तान व दक्षिण आशियाच नव्हे तर जगाच्याही राजकारणाला कलाटणी मिळाली. रशियाच्या अतिक्रमणामुळे अमेरिकेला दक्षिण आशियातील आपल्या हितसंबंधांची काळजी वाटू लागली. त्यामुळे या देशातील रशियाची राजवट उखडण्यासाठी अफगाणिस्तानातील कट्टर धार्मिक गटांना आर्थिक आणि शस्त्रास्त्रांचे साहाय्य करून रशियन सैन्याला आव्हान निर्माण करण्याचे धोरण अमेरिकेने आखले. यासाठी पाकिस्तानची मदत घेण्यात आली. यातून तालिबानचा जन्म झाला. त्यानंतरच्या 10 वर्षात या कट्टरपंथियांनी रशियन सैन्याची मोठी हानी केली. अखेर 1989 मध्ये रशियाला तेथून माघार घ्यावी लागली. तथापि, तालिबानचा धार्मिक हिंसाचार सुरूच राहिला. ज्या अमेरिकेच्या साहाय्याने या संघटनेला बळ मिळाले त्याच अमेरिकेविरोधात तिच्या कारवाया सुरू झाल्या. रशियाचे आक्रमण संपले तरी दहशतवादाचा भस्मासूर जिवंतच राहिला. पुढच्या काळात त्याचा ताप साऱया जगाला सहन करावा लागला आणि आजही लागत आहे. याच कालखंडात अफगाणिस्तान भारतापासून दुरावला आणि पाकिस्तानच्या कहय़ात गेला. पाकिस्तानने अफगाणी आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून या देशावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न तेव्हापासून चालविला आहे, तो आजतागायत सुरू आहे. तसेच 1979 पासून अफगाणिस्तानात जे अस्थिर वातावरण निर्माण झाले ते आजपर्यंत कायम आहे. या साऱया घडामोडींचा भारताशी थेट भौगोलिक किंवा राजकीय संबंध नाही. तरी अफगाणिस्तान हा भारतासाठी महत्त्वाचा देश आहे. कारण, मध्य आशियाच्या खनिज समृद्ध देशांशी भारताला संपर्क साधायचा असेल तर अफगाणिस्तानशिवाय दुसरा मार्ग उपलब्ध नाही. पाकिस्तान या संदर्भात भारताशी सहकार्य करणार नाही, हे निश्चित आहे. त्यामुळे इराणच्या माध्यमातून प्रथम अफगाणिस्तान आणि तेथून मध्य आशिया असा मार्ग विकसित करणे ही भारताची आवश्यकता आहे.  याउलट पाकिस्तानही या देशावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान हा अरूंद देश असल्याने भारताशी सामरिक संघर्ष निर्माण झाला तर त्या देशाची कोंडी होऊ शकते. त्यातच अफगाणिस्तान भारताच्या बाजूचा असेल तर पाकची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी होते. म्हणून कोणत्याही परिस्थितीत अफगाणिस्तानात भारताबद्दल सहानुभूती निर्माण होऊ द्यायची नाही, हे पाकचे धोरण आहे. दोन्ही देशांच्या धोरणांमध्ये फरक असा की भारत अफगाणिस्तानात शांततेच्या मार्गाने आणि आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून संबंध प्रस्थापित करू इच्छितो. तर पाकिस्तान त्या देशात हिंसाचार माजवून दहशतीच्या जोरावर आपला कार्यभाग साधू इच्छितो. दहशतवादी हल्ले, बाँबस्फोटांमधून हिंसाचार माजवला जातो. पाकने पोसलेल्या दहशतवादी संघटनांचा आता अमेरिका आणि युरोपियन देशांनाही त्रास होऊ लागल्याने भारताच्या अफगाणिस्तानातील शांततावादी भूमिकेला आता त्यांचे मोठय़ा प्रमाणात समर्थन मिळू लागले आहे.  डोनाल्ड ट्रंप आणि रेक्स टिलरसन यांनी भारताच्या धोरणाचे उघड समर्थन केले असून अफगाणिस्तानातील सध्याची राजवटही भारताच्या बाजूची असल्याचे दिसून येते. सध्या त्या देशाला शांततेची आवश्यकता असून पाकिस्तान हे त्यांच्या शेजारचे राष्ट्र असले तरी त्याच्यावर अफगाणिस्तानचा विश्वास नाही. पाकला तेथे शांतता नको असून त्या देशावर आपले प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वर्चस्व असावे अशी पाकची इच्छा आहे. पण अफगाण जनतेच्या स्वभावानुसार ते कोणाच्याही वर्चस्वाला जुमानत नाहीत. त्यामुळे ते त्यांना पाकपेक्षा भारत जवळचा वाटतो असे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे अफगाणिस्तानच्या संबंधात पाकिस्तान आणि चीन एका बाजूला, तर भारत, अमेरिका आणि युरोपातील राष्ट्रे दुसऱया बाजूला, असे सध्याचे चित्र आहे. भारत ही परिस्थिती संयमाने आणि सामोपचाराने हाताळत असून त्यामुळे जगातिक व्यासपीठावर पाकिस्तान एकटा पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती पुढे सुरू राहणे आवश्यक आहे. भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश भविष्यकाळात  अधिक जवळ आल्यास शांततेच्या दृष्टीनेही ते योग्य ठरणार आहे.

 

Related posts: