|Monday, October 22, 2018
You are here: Home » क्रिडा » व्हीनस उपांत्य फेरीत, गार्सिया विजयी

व्हीनस उपांत्य फेरीत, गार्सिया विजयी 

वृत्तसंस्था/ सिंगापूर

येथे सुरू असलेल्या डब्ल्युटीए टुरवरील 2017 च्या टेनिस हंगामातील महिलांच्या अंतिम स्पर्धेत शुक्रवारी अमेरिकेच्या अनुभवी आणि वयस्कर व्हिनस विल्यम्सने स्पेनच्या मुगुरूझाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे दुसऱया एका सामन्यात गार्सियाने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवताना डेन्मार्कच्या वोझ्नियाकीचा पराभव केला.

गुरुवारी झालेल्या सामन्यात व्हिनस विल्यम्सने स्पेनच्या गार्बिन मुगुरूझाचा 7-5, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडुतील आपले स्थान भक्कम केले. व्हिनसने विम्बल्डन स्पर्धेतील अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा बदला सिंगापूरच्या स्पर्धेत घेतला. व्हाईट गटात व्हिनस विल्यम्सला उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी विजयाची नितांत गरज होती. 2008 साली व्हिनसने ही स्पर्धा जिंकली होती. व्हाईट गटातील प्लिस्कोव्हाने आपले पहिले दोन सामने जिंकले. पण त्यानंतर राऊंड रॉबिन पद्धतीच्या तिसऱया सामन्यात ओस्टापेंकोकडून तिला 6-3, 6-1 असा पराभव पत्करावा लागला. लॅटव्हियाच्या ओस्टापेंकोचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. प्लिस्कोव्हाने या स्पर्धेत आपले पहिले दोन सामने जिंकले आहेत. पण, या गटातून मुगुरूझाने उपांत्यफेरीतील आपले स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे.

गुरुवारी झालेल्या अन्य एका सामन्यात कॅरोलिन गार्सियाने वोझ्नियाकिचा 0-6, 6-3, 7-5 असा पराभव करत रेड गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे. गार्सियाने हा सामना दोन तासांच्या कालावधीत जिंकला. या गटात आता वोझ्नियाकिने यापूर्वीच उपांत्यफेरी गाठली आहे. तर गार्सिया आणि हॅलेप यांच्यात उपांत्यफेरीसाठी चुरस राहिल. स्विटोलिनाने टॉपसिडेड हॅलेपचा पराभव केला तर गार्सियाला उपांत्यफेरीत प्रवेश मिळविण्याची संधी मिळेल. पण हॅलेपने हा सामना जिंकला तर गार्सियाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

Related posts: