|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » युवकाच्या अटकेनंतर संतप्त जमाव रस्त्यावर

युवकाच्या अटकेनंतर संतप्त जमाव रस्त्यावर 

प्रतिनिधी / बेळगाव

खुनी हल्ला प्रकरणी न्यू गांधीनगर येथील एका युवकाला शुक्रवारी अटक करण्यात आली. माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली. अटकेच्या या कारवाईनंतर पोलीस अधिकारी व माजी नगरसेवक यांच्यात वादावादीचा प्रसंग घडला. त्यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर आला. राजकीय कारणातून ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुस्ताक दस्तगिर दावणगेरी (वय 30, रा. न्यू गांधीनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर व त्यांच्या सहकाऱयांनी शुक्रवारी मुस्ताकला अटक केली. 22 ऑक्टोबर रोजी रात्री याच परिसरातील एका तरुणावर बाटलीने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यात शहनवाज कल्लूर (वय 22, रा. न्यू गांधीनगर) हा युवक जखमी झाला होता. शुक्रवारी शहनवाजसह चौघा जणांविरूद्ध प्रतिफिर्याद दाखल करण्यात आली आहे. दिवसभरातील या घडामोडींमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस आयुक्त कार्यालयासमोर संतप्त जमावाने आमदार फिरोज सेठ यांच्या प्रतिमेचे दहन केले.

मुस्ताकला अटक केल्याची माहिती मिळताच माजी नगरसेवक अजिम पटवेगार हे काही जणांसमवेत माळमारुती पोलीस स्थानकात पोहोचले. यावेळी पोलीस अधिकारी व अजिम यांच्यात वादावादी झाली. वादावादीनंतर न्यू गांधीनगर परिसरातील नागरिक पोलीस स्थानकासमोर जमा झाले. त्यामुळे माळमारुती पोलीस स्थानक परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला.

संतप्त जमावाने पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांची भेट घेतली. राजकीय दबावाखाली त्या युवकाला अटक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर आमदारांच्या प्रतिकृतीचे आयुक्त कार्यालयाजवळ दहन करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन अमरनाथ रेड्डी यांनी दिले.

Related posts: