|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लोखंडी कमानी हटवा, अन्यथा पुलाची दुरुस्ती करा

लोखंडी कमानी हटवा, अन्यथा पुलाची दुरुस्ती करा 

कोळंब पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक

अन्यथा कायदा हातात घेण्याचा इशारा

पंचक्रोशीतील ग्रामस्थांची बैठक

प्रतिनिधी / मालवण:

मालवण-आचरा मुख्य मार्गावरील धोकादायक बनलेल्या कोळंब पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाला वर्ष उलटले, तरी मुहूर्त मिळालेला नाही. 15 नोव्हेंबरपर्यंत पुलाची दुरुस्ती हाती घेऊन खाडीपात्रात पर्यायी रस्त्याची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अन्यथा सर्जेकोट व लगतच्या गावातील हजारो ग्रामस्थ कायदा हातात घेत कोळंब पुलावरील संरक्षक लोखंडी कमानी उखडून टाकतील, असा इशारा ग्रामस्थांतर्फे बांधकाम विभागाला देण्यात आला आहे.

सर्जेकोट, कोळंब, रेवंडी, हडी व कांदळगाव या पाचही गावातील ग्रामस्थांची संयुक्त बैठक नुकतीच सर्जेकोट येथे झाली. या बैठकीत पुलाची दुरुस्ती हाती घेण्यापूर्वी बांधकाम विभागाने कोळंब खाडीपात्रात खापरेश्वर मंदिर ते मालवण सागरी महामार्ग नाका येथे बंधारा कम पर्यायी रस्ता उभारावा, अशी मागणी वजा सूचना बांधकाम विभागाकडे केल्याची माहिती मत्स्य उद्योजक गोपीनाथ तांडेल यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाणार असून त्यासाठी निधी मंजूर असून दुरुस्तीसाठी सहा महिने कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्याची मागणी नव्याने केल्याने त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. मालवण-आचरा मार्गावरील कोळंब, सर्जेकोट, रेवंडीसह कांदळगाव व हडी या गावातील ग्रामस्थांचा मालवणशी जोडण्याचा कोळंब पूल हा महत्वाचा दुवा आहे. असे असताना येथील ग्रामस्थ, व्यावसायिक, मच्छीमार, शेतकरी, बागायतदार व विद्यार्थ्यांचा कोणताही विचार शासन व प्रशासकीय यंत्रणेने केलेला नाही. त्यामुळे पुलाची दुरुस्ती वर्षभर रखडली. पर्यटन व मासेमारी व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबत येत्या पंधरा दिवसांत योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा ग्रामस्थांना कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा बांधकाम विभागाला देण्यात आला आहे.

बांधकाम विभागाकडून पाहणी 

ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला धडक दिल्यानंतर बांधकाम विभागाच्या प्रमुख अधिकाऱयांनी कोळंब येथे येऊन ग्रामस्थांसोबत पर्यायी मार्गाविषयी चर्चा करून परिसराची पाहणी केली. शाळेतील मुलांचे, प्रवाशांचे हाल, पर्यटकांची होणारी गैरसोय, मच्छीमारांचे मासे बाजारात वेळेत पोहोचू शकत नाहीत, वाढलेला खर्च याची जाणीव अधिकाऱयांना देण्यात आली. वेळीच पूल दुरुस्तीचे काम झाले असते, तर ही वाहतूक बंद करण्याची वेळ आली नसती. आणखी किती वर्षे वाट पाहवी लागणार? असा प्रश्न उपस्थितांनी केला. पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिल्याखेरीज पूल दुरुस्तीचे काम सुरू करू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. पर्यायी मार्ग म्हणून खापरेश्वर मंदिराजवळील गणेश घाट ते धुरीवाडा जुनी सिमेंट पापडी असा दोनशे किमीचा मार्ग ग्रामस्थांनी सूचविला.

सहनशिलतेचा अंत पाहू नका!

ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत आता झाला आहे. आम्ही यापुढे अजिबात थांबणार नाही. सनदशीर मार्गाने वेळोवेळी प्रस्ताव देऊन झाले. ग्रामसभेचे ठराव पाठवून झाले. उपोषणे करून झाली. वेळोवेळी ग्रामस्थ भेटून आले. अधिकारी व शासन जर जागे होत नसेल, तर शासनाला जाग आणण्यासाठी मोर्चा किंवा आंदोलन हा मार्ग असेल. म्हणून 10 नोव्हेंबरपर्यंत शासनाकडून कोणताच प्रतिसाद न आल्यास तसेच अधिकाऱयांना पत्रव्यवहार करून तशी समज देऊन 15 नोव्हेंबरला आचरा, वायंगणी, तळाशिल, तोंडवळी, हडी, रेवंडी, कांदळगाव, मसुरे, कोळंब, सर्जेकोट या ग्रामस्थांचे ठराव ग्रा. पं.मार्फत पाठवून हजारोंच्या संख्येने कोळंब पूल ठिकाणी उपस्थित राहून मुलांच्या प्रवासासाठी शिक्षणासाठी पूल खुले करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पूल बंद करायला आम्ही ग्रामस्थ देणार नाही. यानंतरच्या परिणामांना शासनच व अधिकारी वर्ग जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असे गोपीनाथ तांडेल, अध्यक्ष जनार्दन आडकर, नितीन आंबेरकर, केदार केळुसकर, अविनाश कोळंबकर, नागेश परब, भगवान मुंबरकर, श्रीराम जामसंडेकर, बा. स. लाड, सुंदर परब, भाई ढोलम, उदय परब, संदीप भोजने, गणेश सारंग, भास्कर कवटकर, अनिल चव्हाण, सुदेश लाड, शुभम लाड, गणेश आचरेकर, विवेक खडपकर यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts: