|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » राज ठाकरेंनी घेतली सुशांत माळवदेंची भेट

राज ठाकरेंनी घेतली सुशांत माळवदेंची भेट 

प्रतिनिधी/ मुंबई

फेरीवाल्यांच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कांदिवली पश्चिम येथील ऑस्कर हॉस्पिटलमध्ये जाऊन तब्येतीची विचारपूस केली. ठाकरे यांनी डॉ. नितीन पवार आणि सतीश वणवे यांच्याशी चर्चा करून माळवदे यांची काळजी घेण्याची सूचना केली. यावेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, राज ठाकरे यांचा मुलगा अमित, पोलीस अधिकारी विक्रम देशमाने यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. माळवदे यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे येणार असल्याने कांदिवली तसेच मालाड स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. माळवदे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलणे टाळले.

शनिवारी माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती तसेच उजवा हातही प्रॅक्चर झाला होता. त्यांना सोमवार बाजार येथील जान्हवी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र शनिवारी रात्री उशिरा त्यांना कांदिवली (प.) येथील ऑस्कर रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले.

माळवदे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांनतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक होताना प्रसारमाध्यमांशी बोलताना यापुढे हातपाय तोडून जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली होती. त्यामुळे रविवारी राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता होती मात्र त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.

Related posts: