|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » रूमानियाची हॅलेप अग्रस्थानी

रूमानियाची हॅलेप अग्रस्थानी 

वृत्तसंस्था / पॅरीस

सोमवारी येथे घोषित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत 2017 च्या टेनिस हंगामाअखेर रूमानियाच्या सिमोना हॅलेपने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. सिंगापूरमध्ये झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील अंतिम स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविणाऱया डेन्मार्कच्या कॅरोलिनी वोझ्नियाकीला या मानांकन यादीत तिसरे स्थान मिळाले आहे.

चालू महिन्यांच्या प्रारंभी रूमानियाच्या हॅलेपने पहिल्यांदाच या मानांकन यादीत पहिले स्थान मिळविले होते पण त्यानंतर झेकच्या प्लिसकोव्हाकडून हॅलेपला सिंगापूर स्पर्धेत उपांत्य फेरीत हॅलेपला पराभव पत्करावा लागला होता. सिंगापूरच्या या वर्षीच्या शेवटच्या स्पर्धेत रविवारी वोझ्नियाकीने अमेरिकेच्या व्हिनस विलीयम्सला पराभूत करून एकेरीचे जेतेपद मिळविले होते.

डब्ल्यूटीए ताज्या मानांकन यादीत रूमानियाची सिमोना हॅलेप 6175 गुणांसह पहिल्या, स्पेनची मुगुरूझा 6135 गुणांसह दुसऱया, डेन्मार्कची वोझ्नियाकी 6015 गुणांसह तिसऱया, झेकची प्लिसकोव्हा 5730 गुणांसह चौथ्या, अमेरिकेची व्हिनस विलीयम्स 5597 गुणांसह पाचव्या, युक्रेनची स्विटोलिना 5500 गुणांसह सहाव्या, लॅटव्हियाची ओस्टापेंको 5010 गुणांसह सातव्या, फ्रान्सची गार्सिया 4420 गुणांसह आठव्या, ब्रिटनची कोंटा 3610 गुणांसह नवव्या आणि फ्रान्सची मॅलेडेनोव्हिक 2885 गुणांसह दहाव्या स्थानावर आहेत.