|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भेदरलेलं कोंकणगांव अन् चिडीचुप माणसं..!

भेदरलेलं कोंकणगांव अन् चिडीचुप माणसं..! 

किरण जाधव / जत

महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात एकेकाळी प्रचंड दहशत, दबाव असलेल्या श्रीशैल चडचण टोळीचा म्होरक्या तथा त्याचा पुतण्या धर्मराज मल्लीकार्जुन चडचण हा सोमवारी उमदीपासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱया कोंकणगांव येथे पोलीस चकमकीत ठार झाला. धर्मराज याच्याकडे विनापरवाना शस्त्रास्त्रे असल्याच्या माहीतीवरून चडचण पोलीस ठाण्याचे पीएसआय गोपाल हुल्लुर यांनी त्याच्या कोंकणगावच्या फार्महाऊसवर धाड टाकली होती. याचवेळी ही चकमक घडली अन् या घटनेने सीमावर्ती भागात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या सांगली, सोलापूर, सातारा, पुणे इथपर्यंत कनेक्शन असणारी ही टोळी. धर्मराजच्या घटनेनंतर कोंकणगाला भेट दिली. इथलं वातावरण म्हणजे भेदरलेलं गाव अन् चिडीचूप माणसं असचं पाहयला मिळालं!

कोंकणगाव जत तालुक्यातील उमदीपासून तीन किलोमीटरवर चडचण रस्त्यावर असणारे सुमारे दोन हजार लोकवस्तीचं छोटसं खेडं. याच गावात धर्मराज चडचण आणि पीएसआय गोपाल हुल्लुर यांच्यात चकमक उडाली. खरेतर धर्मराज याचे मूळगाव व्हळी उमराणी ता. इंडी जि. विजापूर. कोंकणगाव हे त्याचे आजोळ होते. येथेच त्याने उमदीकडे जाणाऱया रस्त्यावर जमीन खरेदी केली होती. याच जमीनीत त्याचे फार्महाऊस आहे. अलिकडे सहा महीन्यापूर्वीच तो तुरूंगातून बाहेर आल्याचे सांगण्यात आले. धर्मराज याचा पुण्यातही व्यवसाय असल्याने तिथेही असायचा तर कांही दिवस कोंकणगाच्या फार्महाऊसवर थांबायचा. मागच्या दीडेक महीन्यापासून तो कोंकणगाव येथे आला होता. त्यानंतर चडचण पोलीसांचा या गावावर सतत वॉच असायचा. चडचणचे पीएसआय गोपाल हुल्लुर हे दर चार दिवसांनी कोंकणगावला भेट देत होते.

श्रीशैल चडचण ते धर्मराज चडचण 

सीमावर्ती भागात एकेकाळी चडचण टोळीची मोठी दहशत होती. महाराष्ट्र कर्नाटकात अनेक गुन्हे या टोळीने केले होते. श्रीशैल चडचण याचा ऑक्टोबर 1997 मध्ये माळशिरस जि. सोलापूर येथे सांगली पोलीसांनी एन्काँउटर केला होता. त्यानंतर या टोळीची जबाबदारी श्रीशैल याचा भाऊ मल्लीकार्जुन याच्यावर होती. मल्लीकार्जुन याच्यावरही अनेक गुन्हे असल्याने त्याला पोलीसांनी अटक केली होती. कर्नाटकच्या तरूंगात शिक्षा भागत असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मल्लीकार्जुन यांची दोन मुले शांताप्पा व धर्मराज हे या टोळीचे काम पाहत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु शांताप्पा यांचा कांही वर्षापूर्वी खून झाला. या टोळीला जशी अनेक गुन्हय़ांची पार्श्वभूमी आहे, तशीच मुळगांव व्हळी उमराणी येथील पुत्राप्पा भैरगोंड व श्रीशैल चडचण यांच्यातील पारंपारीक वैरत्वाचीही किनारही आहे. या देन टोळय़ांचे मोठे हाडवैर असल्याचे सीमावर्ती भागात सांगण्यात येते. त्यामुळे अलिकडच्या कांही वर्षात चडचण टोळीचा कुणीही वारसदार व्हळी उमराणी येथे जात नव्हते. धर्मराज चडचण हा आपले आजोळ कोंकणगाव, पुणे याच भागात असायचा. शिवाय चडचण टोळीची मोठी प्रॉपर्टी पुणे तसेच सीमावर्ती भागात असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय घडले सोमवारी

कोंकणगाव येथील उमदीकडे जाणाऱया जुन्या रस्त्यावर आणि गावापासून दीड किलोमीटर अंतरावर धर्मराज याची शेतजमीन आहे. अलिकडेच ही जमीन त्याने खरेदी केली होती. येथे पाण्याची व्यवस्था करून येण्या जाण्यासाठी मुरूमीकरणाचे रस्तेही केले आहेत. आजुबाजूला जवळपास कुणाची वस्तीही नाही. येथे त्याने कोकणी पध्दतीच्या तीन झोपडय़ा बांधल्या आहेत. त्याला अगदी फार्महाऊसचा लुक देण्यात आला आहे. सहा महीन्यापूर्वी जेलमधून बाहेर आल्यानंतर तो येथे आला होता. तेंव्हापासून चडचण पोलीसांची या गावात गस्त वाढली होती. दर चारेक दिवसांनी पीएसआय गोपाल हुल्लुर येथे भेट देत असत. सोमवारी सकाळी पीएसआय गोपाल हुल्लुर हे धर्मराजकडे शस्त्रास्त्रे असल्याच्या माहीतीवरून तपासणीसाठी आले होते. याचवेळी धर्मराज व हुल्लुर यांच्यात चकमक झाली. स्वसंरक्षणार्थ पीएसआय हुल्लुर यांनीही धर्मराज याच्यावर गोळीबार केला. यात तो ठार झाला. तर त्याचा साथीदार शिवानंद बिरादार हा जखमी झाला आहे. पीएसआय गोपाल यांच्याही मांडीला एक गोळी लागली आहे.

ही घटना वाऱयासारखी सीमावर्ती भागात पसरली. परंतु पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मोठा पोलीस बंदोबस्त तातडीने येथे लावला. जिथे घटना घडली त्या परिसराकडे येणारे रस्ते दोन किलोमीटर अंतरावरच सील केले होते. सोमवारी दिवसभर कुणालाही येथे सोडण्यात येत नव्हते. रात्री उशिरापर्यंत त्या फार्महाऊसमध्ये पोलीसांच्या हाती काय लागले याचीही माहीती देण्यात आली नाही. कर्नाटक पोलीसांचे वरीष्ठ अधिकारी मात्र चडचण व कोंकणगाव येथे तळ ठोकून होते. कोंकणगावमध्ये पोलीसांचा बंदोबस्तही मोठा लावण्यात आला आहे.

भेदरलेलं गाव अन् चिडीचुप माणसं

कोंकणगावला या घटनेनंतर भेट दिली. अनेक माणसांशी, पोलीसांशी या घटनेबाबत बोलण्याचा प्रयत्न केला. पण कुणीच कांही बोलायला तयार नाही. अनेकांची घरे बंद, चौकात शांतता, चार आठ माणसं कोपऱयात उभी राहीलेली, पोलीसांच्या, अधिकाऱयांच्या गाडय़ांची ये जा यामुळे कोंकणगावचे वातावरण अतिशय दहशतीच्या सावटाखाली दिसत होते. धर्मराज बददल कुणी बोलायला तयार नाही. एक दोन माणसांनी पोलीसांची गाडी दर चार दिवसाला येत होती, तशीच आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आल्याचे सांगितले. पण घटना काय झाली, त्याचे कारण काय यावर पोलीसही आणि माणसंही बोलण्यास तयार नाहीत. चडचण पोलीस ठाण्यातही अधिकाऱयांनी अजून तपासाचे काम चालु आहे. पोलीस महासंचालकांची भेट होणार आहे, तोपर्यंत माहीती देता येणार नाही असेच सांगण्यात आले.

तर कोंकणगात प्रवेश करताच उजव्या बाजुला एका कौलारू घरासमोर अनेक महीला मोठय़ांनी आक्रोश करीत असल्याच्या दिसल्या. त्या धर्मराज याचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले. येथे त्याची आई विमलाबाई देखील होत्या. एकुणच सोमवारी सकाळपासून कोंकणगाव एका गंभीर सावटाखाली होते. तर सीमावर्ती भागातील अनेक गावचे लोकही येत जात होत, पण कुणी कांही चर्चा करायला तयार नव्हते. केवळ भेदरलेलं गाव आणि चिडीचूप माणसं हेच चित्र दिवसभराचे होते.

Related posts: