|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नारायण राणेंच्या प्रवेशाला विरोध निरर्थक

नारायण राणेंच्या प्रवेशाला विरोध निरर्थक 

मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण  ‘अल्टिमेटम’इतके वाईट दिवस आले नसल्याचा दावा

प्रतिनिधी /मुंबई

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला शिवसेनेचा असलेला विरोध निरर्थक असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले. फडणवीस सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे संकेत दिले.

नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेऊ नये यासाठी शिवसेनेने अल्टिमेटम दिल्याच्या बातम्यांबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलताना अशा बातम्या कुठून येतात समजत नाही. शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर चिठ्ठीr घेऊन अल्टिमेटम देतात अशा बातम्या येतात. पण उद्धवजी आणि माझ्यात चांगला संवाद आहे. मिलिंद नार्वेकर माझ्याकडे प्रस्ताव घेऊन येतील इतके माझे वाईट दिवस नाहीत. अर्थात मिलिंद नार्वेकर भला माणूस आहे, पण माझ्यावर अजून तशी वेळ आलेली नाही, अशी कोपरखळीही मुख्यमंत्र्यांनी मारली.

राणे यांनी काँग्रेस सोडून स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांनी स्वत: एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही जर शिवसेनेतील कोणाला प्रवेश दिला असता तर सेनेचा विरोध ठीक होता, मात्र राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबद्दल सेनेने विरोध करणे निरर्थक असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्र्यांनी दिला.

शिवसेनेसोबत आमचा योग्य समन्वय आहे. मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने निर्णय घेतो. केवळ थेट सरपंच निवडीला शिवसेनेने विरोध केला. त्यावेळी बहुमत घेण्यात आले मात्र तो निर्णय वगळता, सर्व निर्णय एकमताने घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरेंसोबत संवाद साधण्यासाठी बैठकांची गरज नाही, आम्ही योग्यरितीने संवाद साधतो. आम्हाला मध्यस्थांची, बैठकांची गरज भासत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related posts: