|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » मुंबईतील हॉकी प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

मुंबईतील हॉकी प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ 

वृत्तसंस्था / मुंबई

भारतीय खेळाडू युवराज वाल्मिकी व त्याचा भाऊ देविंदर वाल्मिकी यांनी आयोजित केलेल्या हॉकी प्रशिक्षण शिबिराला बुधवारी येथील मुंबई हॉकी संघटनेत सुरुवात झाली. दि. 10 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱया या शिबिरात जर्मन प्रशिक्षक फॅबियन रोझवाडोस्की देखील स्वतः मार्गदर्शन देत आहेत. सध्या ते जर्मनीच्या पुरुष संघाला हॅम्बुर्गमध्ये ऍल्स्टर क्लबसाठी प्रशिक्षण देत आहेत. या प्रशिक्षण शिबिरानंतर प्रदर्शनीय लढत खेळवली जाणार असून त्यात भारताचे स्टार खेळाडू व शिबिरातील सहभागी युवा खेळाडूंमध्ये जुगलबंदी रंगेल, असे संकेत आहेत.स्वतः आक्रमक मिडफिल्डर म्हणून ओळखल्या जाणाऱया देविंदरने यावेळी फॅबियन यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण खेळात थोडीफार सुधारणा करु शकलो असल्याचे नमूद केले. या प्रशिक्षण शिबिराबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला, ‘मी जर्मन लीग बुंदेस्लिगामध्ये खेळलो. अगदी माझा भाऊ युवराज वाल्मिकी देखील तिथे खेळला आहे. आता महाराष्ट्रातील नव्या पिढीतील खेळाडूंना हॉकीचे उत्तम धडे घेता यावेत, यासाठी आम्ही फॅबियन यांना विनंती केली व ती त्यांनी स्वीकारली देखील आहे. माजी भारतीय हॉकीपटू धनंजय महाडिकने सर्वप्रथम जर्मन लीग खेळली व बुंदेस्लिगात कसे खेळावे, हे आम्ही त्याच्यापासूनच शिकलो. या प्रशिक्षण शिबिरात धनराज पिल्ले हे देखील मार्गर्शन करणार आहेत.’

Related posts: