|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बोलेरो आणि कंटेनरच्या धडकेत दोघे ठार

बोलेरो आणि कंटेनरच्या धडकेत दोघे ठार 

प्रतिनिधी/ मिरज

मिरज-पंढरपूर मार्गावर भोसेजवळ कंटेनर आणि बोलेरे पिक व्हॅनची समोरासमोर धडक होऊन नबी मौला शेख आणि खंडू चंद्रकांत चांदणे (दोघे रा. पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे दोघे फळ व्यापारी ठार झाले. तर, अन्य सहा जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. कोल्हापूरहून फळविक्री करून परतताना या फळविक्रेत्यांवर काळाने घाला घातला. जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

   बार्शी तालुक्यातील पांगरी येथील शेख बंधू हे फळविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची स्वतःची बोलेरो पिकअप व्हॅन आहे. बार्शी तालुक्यातील फळउत्पादकांकडून फळे घेऊन ते कोल्हापूर मार्केटमध्ये येतात. बुधवारी सकाळी शेख बंधू आणि बार्शी तालुक्यातील सहा व्यापाऱयांना घेऊन सीताफळे विकण्यासाठी कोल्हापूर बोलेरो पिकअप व्हॅनने निघाले. कोल्हापूरमध्ये जाऊन त्यांनी लिलावात सीताफळे विकली.

  दुपारी दीडच्या सुमारास ते कोल्हापूरहून मिरजमार्गे बार्शीकडे निघाले. त्यांची बोलेरे (एमएच25पी58 17) ही भोसेजवळ हॉटेल नंदनवन जवळ आली असता, पंढरपूरहून येणाऱया कंटेनर (एचआर55एपी 2904) ने बोलेरोला समोरून जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, बोलेरो तीन चार पलटय़ा खाऊन रस्त्याकडेला जाऊन पडली.

आसपासच्या नागरिकांनी प्रवाशांनी तातडीने या गाडीतील जखमींना गाडीतून बाहेर काढले. एकशे आठ क्रमांकांची व्हॅन तात्काळ घटनास्थळी आली. मात्र, नबी मौला शेख जागीच ठार झाले होते. अन्य जखमींना तात्काळ शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वाटेत खंडू चंदकांत चांदणे यांचा मृत्यू झाला.

   अन्य जखमीमध्ये दस्तगीर याकूब शेख, राजू चाँद शेख, बोलेरो चालक महेबूब शेख, आप्पासाहेब शिंदे, यांसह अन्य दोघांचा समावेश आहे. त्यापैकी दस्तगीर शेख आणि राजू शेख यांची प्रकृती चिंताजनक आहे. कंटेनरचालकाने कंटेनर पुढे काही अंतरावर नेऊन उभा केला. तो बेपत्ता झाला आहे. शेख बंधू हे नेहमीच कोल्हापूरकडे गाडीतून त्या त्या मोसमानुसार विविध प्रकारची फळे घेऊन जातात. बुधवारीही ते सीताफळे घेऊन गेले होते. तेथून परतताना अपघात झाला.

 

Related posts: