|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नऊ लाखांच्या अंगठय़ा घेऊन दोन बंगाली कारागिर पसार

नऊ लाखांच्या अंगठय़ा घेऊन दोन बंगाली कारागिर पसार 

प्रतिनिधी/ सांगली

 पॉलीशसाठी दिलेल्या 318 ग्रॅम वजनाच्या नऊ लाख रूपयांच्या सोन्याच्या अंगठय़ा घेऊन दोघा बंगाली कारागिरांनी पोबारा केल्याची घटना सांगलीत नुकतीच घडली आहे. सुशांत सदाशिव भुर्के वय 38 रा.पाटील गल्ली, वीरभद्र मंदिरासमोर सांगली या सुवर्णकारागिराने शहर पोलिसात दोघाविरूध्द तक्रार दिली आहे. त्यानुसार मुजाहिद शेख रा. 24 परगाना पश्चिम बंगाल आणि रियाजूल मिदा रा.बोरगेज मिदापाडा पश्चिम बंगाल या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, सुशांत भुर्के यांचा पाटील गल्लीत तीन मजली बंगला आहे. बंगल्यातच ते सुवर्णकारागिरीचे काम करतात. सोने पॉलीश करणे, दागिने तयार करणे अशी कामे करतात. कोल्हापूर येथे सुवर्णकारागिराकडे काम करणाऱया रियाजूल मिदा याच्या ओळखीने 15 ऑक्टोबर 2017 रोजी त्यांनी मुजाहिद याला कामावर घेतले होते. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 318 ग्रॅम वजनाच्या महिलांच्या 92  सोन्याच्या बिगर खडय़ाच्या  अंगठय़ा त्यांच्याकडे पॉलीशसाठी आल्या होत्या. भुर्के यांनी मुजाहिदला अंगठय़ा पॉलीश करण्यासाठी सांगितले. पण, अंगठय़ा कपाटात ठेवल्याचे नाटक करून त्याने बँकेत जाऊन येतो, अशी मालकाला थाप लावली.

बँकेत जाऊन एक तास झाला तरीही तो परत न आल्याने भुर्केनी कपाट उघडून अंगठय़ा आहेत का? याची खात्री करण्याचा प्रयत्न केला. पण कपाट लॉक असल्याने अंगठय़ा आत असतील या शक्यतेने गप्प बसले. मुजाहिदचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे संशय वाढल्याने त्यांनी कपाटचे लॉक तोडून पाहिले असता अंगठय़ा ठेवल्याच नव्हत्या. तेव्हापासून मुजाहिद गायब आहे. पण, त्याला कामावर ठेवण्याची मध्यस्थी करणारा मिदाही गायब आहे. दोघाविरूध्द गुन्हा दाखल करून शहर पोलीस तपास करीत आहेत.