|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लक्झरी बस उलटून बाराजण जख

लक्झरी बस उलटून बाराजण जख 

खारेपाटण येथे अपघात : मुंबईहून आचऱयाला निघाली होती बस : दोघे गंभीर

प्रतिनिधी / खारेपाटण:

मुंबई-गोवा हायवेवर खारेपाटण टाकेवाडी येथे एका अवघड वळणावर विरार (मुंबई) येथून सुटलेली व आचरा-मालवण येथे जाणारी रामेश्वर ट्रव्हल्स बस (क्र. एमएच 04 जीपी 8085) शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास उलटून बारा प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर चालक व क्लिनर फरार झाला. चालकाचा ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला ही बस उलटली.

विरार (मुंबई) येथून शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता सुटलेली रामेश्वर ट्रव्हल्सची बस नेहमीच्या चालकाने घेऊन न जाता त्याने आपल्या ओळखीच्या दुसऱया चालकाकडे देऊन आचरा (ता. मालवण) येथे घेऊन जाण्यास सांगितले. मात्र शनिवारी पहाटे खारेपाटण टाकेवाडी येथे अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून ही बस रस्त्याच्या बाजूला उलटली. अपघाताचे वृत्त खारेपाटणमध्ये समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मंडावरे यांनी जखमींवर उपचार केले. गंभीर जखमी दोघा प्रवाशांना कणकवली येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

जखमी प्रवासी पुढीलप्रमाणे आहेत – मनाली सुनील अपराज (22) आचरा-मालवण, जयप्रकाश श्रीधर म्हापणकर (58) आचरा-मालवण, निलिमा नारायण गुरव (45) मणचे-देवगड, नारायण बाबाजी गुरव (49) मणचे-देवगड, पुंडलिक धोंडू सावंत (55) चिंदर-कोंडवाडी, पल्लवी बापू परब (35) श्रावण- मालवण, लावण्य बापू परब (6) श्रावण-मालवण, नीतेश मिलिंद कणकवलीकर (18), मनिषा मनोज कणकवलीकर (50) कणकवली, माया कळसुलकर (56) कणकवली, जुई सुनील अपराज (21) आचरा-मालवण, आजीम गौस कुणकेरकर (22) नांदगाव तिठा हे 12 प्रवासी जखमी झाले. मनाली सुनील अपराज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तसेच पुंडलिक धोंडू सावंत यांचा हात पॅक्चर झाल्यामुळे त्यांना कणकवली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

अपघाताचे वृत्त समजताच, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या 108 च्या ऍम्बुलन्स देवगड, वैभववाडी, कासार्डे येथून घटनास्थळी दाखल झाल्या. तर नरेंद्र महाराज संस्थान नाणीज व गाडगीळ यांच्या खासगी ऍम्बुलन्सनेही जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यास मदत केली. खारेपाटण पोलीस स्टेशनचे हवालदार पी. जे. राऊत, एस. बी. कांबळी यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची माहिती घेतली.  राजापूर पोलीस स्टेशनचे हवालदार ललित देऊसकर, योगेश तेंडुलकर, प्रफुल्ल वाघमारे, योगेश भातडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पंचयादी घातली. लक्झरीचा चालक फरार असल्याने मालक तुकाराम सावंत (वळिवंडे, देवगड) यांना फोन करून माहिती देण्यात आली. सदर बस नवीन असल्याचे समजते. या अपघातात बसचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.

बसचा अपघात झाला, तेव्हा सर्व प्रवासी साखरझोपेत होते. घटनेने प्रवाशांत हलकल्लोळ उडाला. बस सुमारे 15 फूट लांब फरफटत जात उलटली. त्यामुळे क्लिनर साईडचे प्रवासी मोठय़ा प्रमाणात जखमी झाले. यापूर्वी देखील याच अपघातस्थळी दोनवेळा लक्झरी बसना अपघात झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.