|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नळाचे पाणी पिण्यासाठी वापरू नका

नळाचे पाणी पिण्यासाठी वापरू नका 

शेळपेतील नागरिकांना अधिकाऱयांचा सल्ला  तपासणी अहवालानंतर निर्णय

प्रतिनिधी/ वाळपई

शेळपे नगरगाव भागात पाणी उपलब्ध करण्यासाठी वाळपईच्या पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांनी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न करून गावापर्यंत दाबोस पाणी प्रकल्पातून जलवाहिनी टाकली आहे, मात्र तूर्त हे पाणी पिण्यासाठी वापरू नये असे आरोग्य व पाणी पुरवठा खात्याने कळविले आहे. सदर पाणी पिण्यासाठी योग्य आहे याची खात्री पटल्याशिवाय हे पाणी पिण्यासाठी मिळणार नाही. परिणामी नागरिकांना आणखीन काही दिवस टँकरच्या पाण्य़ावर अवलंबून राहावे लागणार आहे.

दाबोस प्रकल्पातील पाण्याचा लाभ शेळपेतील ग्रामस्थांना व्हावा यासाठी गेल्या महिन्यापासून सरकारी पातळीवर मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करून विविध उपाययोजनांद्वारे सदर पाणी गावापर्यंत पोहोचविण्यासाठी यश आलेले आहे. त्यासाठी नगरगाव क्षेत्रातील आंबेडे गावाला पाणी पुरवठा करणाऱया वाहिनीला जोडून पुढील वाहिनी घालण्यात आली आहे. सदर वाहिनीच्या माध्यमातून गावातील पंपापर्यंत पाण्याची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी दोन टाक्या उभारून त्यात पाणीसाठा करण्यात येणार आहे. या टाक्यांना खास पंप बसवून नळाद्वारे नागरिकांना पाणी देण्याची ही योजना आहे.

नाल्याच्या दूषित पाण्याचा वापर केल्याने नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागले होते. त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेत सदर पाण्याचे नमुने वाळपईच्या पाणी पुरवठा खात्याने गोळा करून तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. सदर नमूना अहवाल सोमवारपर्यंत येण्याची शक्यता अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे. तोवर सदर पाण्याचा वापर पिण्यासाठी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरच्या माध्यमातून सुरू केलेला पाणी पुरवठा तसाच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

मात्र काही तांत्रिक कारणांमुळे शेळपे गावातील नागरिकांना दोन तासांपेक्षा जास्त काळ पाणी पुरवठा करणे कठीण असल्याचे सांगण्यात आले आहे. जास्त काळ पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा परिणाम नगरगाव व इतर गावांच्या पाणी पुरवठय़ावर होण्याची शक्यता आहे. यामुळे कोणत्याही वेळी दिवसातून दोन तास पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Related posts: