|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सहा महिन्यांत अर्थसंकल्पातील 40 टक्के निधी खर्च

सहा महिन्यांत अर्थसंकल्पातील 40 टक्के निधी खर्च 

प्रतिनिधी/ पणजी

पहिल्या सहा महिन्यांतच अर्थसंकल्पातील तरतुदीतील 40 टक्के निधी खर्च करण्याचा विक्रम सरकारने केला आहे. यापैकी 1300 कोटी रुपये केवळ साधन सुविधा निर्मितीवरच खर्च करण्यात आले आहेत. यंदा अर्थसंकल्पातील 90 टक्के निधी खर्च होणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गेले महिनाभर वित्त व नियोजन खाते सर्व खात्यांशी याबाबत चर्चा करीत होते, असेही पर्रीकर म्हणाले.

अर्थसंकल्पातील तरतुदीत विविध खात्यांसाठी आर्थिक तरतूद केली जाते. तरतूद केलेला निधी खात्यांनी वेळेत खर्च करायचा असतो, पण बऱयाचवेळा शेवटच्या दोन महिन्यांत हा निधी खर्च करण्यासाठी घाई केली जाते. त्यामुळे या खर्चाचे नियोजन योग्यपद्धतीने होऊ शकत नाही. त्यामुळे वित्त आणि नियोजन खात्याच्या अधिकाऱयांनी अन्य खात्यांच्या अधिकाऱयांशी याबाबत चर्चा केली. काल दुपारपासून तब्बल चार तास विविध खात्यांच्या अधिकाऱयांशी चर्चा करण्यात आली.

28 मोठय़ा खात्यांवर चर्चा

100 कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करणाऱया एका सरकारच्या 28 मोठय़ा खात्यांच्या अधिकाऱयांशी चर्चा करण्यात आली. या खात्यांच्या अधिकाऱयांना बोलावून घेऊन चर्चा करण्यात आली. गेली अनेक वर्षे सप्टेंबरपर्यंत आर्थिक तरतुदीतील केवळ 26 ते 28 टक्केच रक्कम खर्च केली जात होती. पहिल्या सहा महिन्यांत कमी रक्कम खर्च केली जात असल्याने पुढील सहा महिन्यांत उर्वरित रक्कम खर्च करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे बऱयाचवेळा शेवटच्या दोन महिन्यांत घाई केली जात होती.

अर्थसंकल्पातील तरतूद ही 12 महिन्यांसाठी असते. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यांत 42 टक्के तर दुसऱया सहा महिन्यात 58 टक्के अशा पद्धतीने निधी पुरवठा केला जायचा, मात्र यंदाच्या वर्षी बहुतेक सर्वच खात्यांनी 45 ते 48 टक्क्यांपर्यंत निधी खर्च केला आहे. सरकारी 40 टक्के निधी खर्च करण्यात यश आले आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे प्रमाण 48 टक्क्यांपर्यंत गेले असेल. यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पीय तरतुदीतील 90 टक्के खर्च करण्यापर्यंत सरकार मजल मारणार, असेही ते म्हणाले. मागील दहा पंधरा वर्षात अशाच पद्धतीने अर्थसंकल्पीय रक्कम खर्च केली नव्हती. यामध्ये पुरवणी अर्थसंकल्पीय तरतुदीचाही समावेश असल्याचे ते म्हणाले.

साधन-सुविधा निर्मितीवर 1300 कोटी खर्च

विविध खात्यांनी निर्माण केलेल्या साधन-सुविधांवर 1300 कोटी खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे 25 टक्के निधी हा साधन सुविधा निर्मितीवरच खर्च झालेला आहे. जीसुडा, साबांखा, पाणीपुरवठा, वीज, वन , क्रीडा अशा विविध खात्यांवर हा निधी खर्च करण्यात आला आहे. मागील महिनाभर चाललेल्या बैठकीत पुढील वाटचालीवर चर्चा करण्यात आली व काही सूचनाही करण्यात आल्या.

जीएसटीतून 270 कोटी

राज्य सरकारची तिजोरी सक्षम असल्यानेच निधी खर्च करणे शक्य होत आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटीतून 270 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. पहिल्याच महिन्यात 246 कोटी तर मागील महिन्यात 254 कोटीपेक्षा जास्त निधी जेसटीच्या माध्यमातून मिळाला होता. केंद्र सरकारकडून जीएसटीच्या माध्यमातून दर महिन्यात 15 ते 20 तारखेपर्यंत निधी प्राप्त होतो. डिसेंबरपर्यंत यामध्ये वाढ होणार असल्याचेही ते म्हणाले.

आंचिमसाठी 10 कोटींची तरतूद

गोवा करमणूक सोसायटीचे मागील सर्व बिलांचे पैसे दिले असून यंदाच्या आंचिमसाठी 10 कोटी रुपये सरकारने दिले आहेत. अनेक विभागांची थकित वीज बिले देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.

Related posts: