|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कदंबच्या पास योजनेला वर्षाची मुदतवाढ

कदंबच्या पास योजनेला वर्षाची मुदतवाढ 

प्रतिनिधी/ पणजी

कदंब महामंडळाच्या सवलतीच्या दरातील प्रवासी पास योजनेला सरकारने आणखी एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. कदंब महामंडळाने पास योजना बंद केल्याने मोठा गोंधळ उडाला होता. नियमितपणे प्रवास करणाऱया प्रवाशांची यामुळे मोठी अडचण झाली होती, मात्र आता सरकारने ही योजना आणखी एका वर्षासाठी वाढविली आहे.

याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, या योजनेतच मुळात दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. आवश्यक असेल त्यावेळी योजनेत दुरुस्ती करणे शक्य असल्याचे योजनेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यानुसार आता एक वर्ष मुदतवाढ दिली आहे, मात्र भविष्यात याबाबत योग्य असा तोडगा काढण्यासाठी एखाद्या एजन्सीमार्फत याबाबत अभ्यास करणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.

कदंब महामंडळाच्या बसगाडय़ातून नियमितपणे प्रवास करणारे प्रवासी तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पास होतात व प्रवास करतात. सवलतीच्या दरातील पासमुळे प्रवाशांना आर्थिकदृष्टय़ाही हे पास बरेच दिलासादायक ठरतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी तर ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते. मागील काही दिवसांपासून कदंबने हे पासेस देणे बंद केले होते. काऊंटरवर पास उपलब्ध करण्यासाठी आलेल्यांना परत पाठविले जात होते. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.

पास योजनेचे नूतनीकरण केले नसल्याचे सांगून प्रवाशांना परत पाठविले जात होते. नूतनीकरणाबाबतची फाईल सरकारकडे मान्यतेसाठी असल्याने निर्णय घेण्यात आला नव्हता, मात्र काल सरकारने हा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा दिला. या योजनेंतर्गत आठवडय़ाच्या पाससाठी तब्बल 40 टक्के सवलत दिली जाते. पंधरवडय़ाच्या पाससाठी 50 टक्के सवलत दिली जाते. तर तिमाही, सहामाही व वार्षिक पाससाठी 60 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे ही योजना प्रवासी व विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक ठरली आहे.

 

 

 

Related posts: