|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » बाबा पार्सेकर यांना रंगभूमी जीवनगौरव

बाबा पार्सेकर यांना रंगभूमी जीवनगौरव 

प्रतिनिधी/ मुंबई

राज्य सरकारतर्फे दिला जाणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना जाहीर झाला असून, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांची निवड केल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली. 5 लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. 20 नोव्हेंबर रोजी बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाटय़मंदिरात पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

बाबा पार्सेकर हे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार आहेत. हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे कार्य मोलाचे आहे. जेजे कला महाविद्यालयातून अप्लाईड आर्टची पदवी घेणाऱया बाबा पार्सेकरांचे प्रसिद्ध नाटय़दिग्दर्शक दामू पेंकरे हे गुरू आहेत. त्यांच्याबरोबर बाबांनी भारतीय विद्या भवनाच्या एकांकिकांचे नेपथ्य केले. विजया मेहता या त्यांच्या दुसऱया गुरू.

ललितकला साधना संस्थेतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. सुरेश खरेंच्या ‘सागर माझा प्राण’ या नाटकाचे वैशिष्टयपूर्ण नेपथ्य बाबांचे होते. आजवर त्यांनी 485 नाटकांचे नेपथ्य केले आहे.

निर्मला गोगटे यांचा जन्म मुंबईचा. पं. कृष्णराव चोणकर, प्रो. बी. आर.देवधर यांच्याकडून आवाज साधना शास्त्राचे विशेष मार्गदर्शन त्यांना मिळाले.  सुरुवातीच्या काळात महिला कलासंगम या स्त्रियांच्या संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिका त्यांनी केल्या. साहित्य संघमंदिर, मुंबई संस्थेमार्फत व्यावसायिक रंगभूमीवर मा. दामले, सुरेश हळदणकर, प्रसाद सावकार, नानासाहेब फाटक, राम मराठे, रामदास कामत, छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर यासारख्या नामवंत कलाकारांसमवेत त्यांनी काम करण्याची संधी मिळाली. व्यावसायिक रंगभूमीबरोबरच त्यांनी अनेक संस्कृत नाटकांतही भूमिका केल्या. भारतात तसेच परदेशात आकाशवाणी आणि दूरदर्शनवर गायनाचे कार्यक्रमही त्यांनी केले आहेत.

विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर तसेच फैय्याज, जनार्दन लवंगारे, रवींद्र लाखे, निर्मिती सावंत, अरुण नलावडे, राजन ताम्हाणे आणि डॉ. वंदना घांगुर्डे हे सदस्य आहेत.

Related posts: