|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » फलटणमध्ये डेंग्यूने घेतला तरूणाचा बळी

फलटणमध्ये डेंग्यूने घेतला तरूणाचा बळी 

प्रतिनिधी/ फलटण

फलटण शहरातील राजेश बबनराव कुरकुटे (वय 38) यांचे रविवारी पहाटे डेंग्यूने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कुरकुटे यांचा मृत्यु अहमदनगर येथे झाला आहे. गेल्या पंधरा दिवसातील डेंग्युने मृत्यु झाल्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे पुन्हा नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

   फलटण शहर आणि परिसरात साथीचे रोग, डेंग्यूने गेल्या 20 दिवसांपासून धुमाकुळ घातला आहे. प्रशासनातर्फे विविध उपाय योजना सुरु असली तरी ही यंत्रणा कमी पडत आहे. आजही फलटण आणि पुणे येथील अनेक रुग्णालयात डेंग्यूचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत.

     राजेश बबनराव कुरकुटे (वय 38) रा. लक्ष्मीनगर, फलटण हे काही दिवसांपासून ताप व थंडीने आजारी होते व ते काही कामानिमित्त अहमदनगर येथे गेले असता त्यांचे रविवारी पहाटे तेथेच निधन झाले. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे परिसरातील नागरिकाकडूंन बोलले जात आहे. यामुळे त्यांनी कोणत्या डॉक्टरकडे व हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले याची माहिती मिळाली नसून त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सार्वजनिक कामात अतिशय हिरीरीने काम करणारा कार्यकर्ता व प्रेमळ स्वभावाने ते शहरात प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, फलटण शहरात विविध रुग्णालयात डेंग्यू तसेच साथीचे रोगासंदर्भात अनेक जण उपचार घेत आहेत. काहींची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.