|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सुरश्री केसरबाई संगीत संमेलनाचा शानदार समारोप

सुरश्री केसरबाई संगीत संमेलनाचा शानदार समारोप 

प्रतिनिधी/ पणजी

सुरश्री केसरबाई केरकर संमेलनाचा तिसरा दिवस जागतिक कीर्तीच्या आणि राष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांनी गाजविला. विख्यात सतारवादक उस्ताद शुजात हुसैन खान यांनी काल रविवारच्या पहिल्या सत्रात संगीत रसिकांना अनोखी मेजवानी दिली तर संमेलनाचा समारोप प्रख्यात गायक कलाकार पं. एम. वेंकटेशकुमार यांच्या गायनाने झाला. दर्जेदार संगीत मैफलींनी समारोपाचा दिवस गाजविला.

 पहिल्या सत्रात सुरुवातीला पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन झाले. त्यांना तबल्यावर भरत कामत व हार्मोनियमवर दत्तराज सुर्लकर यांनी साथसंगत केली.

 त्यानंतर उस्ताद शुजात खान यांची मैफल रंगली. त्यानी अल्हैय्या बिलावल राग सादर केला. आलाप जोड आलाप यांचा सुरेल मिलाप करीत त्यांनी मैफीलीत रंग भरला. सुरवातीला विलंबित तीन तालात बंदिश सादर केली. पूर्ण प्रभूत्व राखून केलेले सादरीकरण उपस्थितांसाठी मन रिझविणारे ठरले. अतिद्रुत गतीत केले जाणारे सफाईदार काम तर पेक्षकांची मोठी दाद मिळवून गेले. खान यांना दोन तबला कलाकारांनी साथसंगत केली. नव्या दमाचे तरुण कलाकार मयंक बेडेकर व सपन अंजारीया यांनी दमदार अशी साथसंगत केली. या बहारदार कार्यक्रमाने रसिकांना अनोखी मेजवानी दिली.

 दुसऱया सत्रात गोव्यातील उदयोन्मुख गायिका कोमल साने यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर अभय रुस्तुम सोपोरी यांचा संतूर वादनाचा कार्यक्रम झाला. संमेलनाची शानदार अशी सांगता पं. एम. वेंकटेशकुमार यांच्या गायनाने झाली.

 कलाकारांची डिरेक्टरी काढणार : गावडे

 संमेलनाच्या समारोपास कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संगीत क्षेत्रातील समीक्षक पं. रवींद्र मिश्रा, शशिकांत चिंचोरे, जनार्दन वेर्लेकर तसेच संमेलनाच्या व्यासपीठाची सजावट करणारे संतोष तारी यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री गावडे यांनी सांगितले की गोव्यातील नामवंत अशा ज्येष्ठ, श्रेष्ठ तसेच सध्याच्या कलाकारांची त्यांच्या माहितीसह डिरेक्टरी कला अकादमीतर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे.