|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजी मनपाला ‘सीएसआर’चा आधार

पणजी मनपाला ‘सीएसआर’चा आधार 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा राज्यात एकमेव असलेली पणजी महानगरपालिका उद्योग समुहांच्या सामाजिक जबाबदारीचा (सीएसआर) आधार घेऊन आपला कारभार हाकत आहे. या महानगरपालिकेचे महापौर सुरेंद्र फुर्तादो हे विविध वित्तीय संस्थांच्या सहकार्याने मनपासाठी कचरावाहू ट्रक, शववाहिका व अन्य विविध प्रकारची उपकरणे उपलब्ध करून घेत आहेत. अशा प्रकारे गरजा भागविणारी ही देशातील पहिली महानगरपालिका आहे, तर अशा प्रकारे कारभार हाकणारे फुर्तादो हे पहिले महापौर आहेत.

महापौरपदाच्या कारकीर्दीत फुर्तादो यांनी विविध वित्तीय संस्थांकडून मनपासाठी उपयुक्त असणारे साहित्य उपलब्ध करून घेतले. पहिल्यांदा महापौर बनल्यानंतर त्यांनी मनपासाठी तब्बल 10 कचरावाहू ट्रक व एक स्काय लीफ्ट मशीन ट्रक आणला. यापैकी चार ट्रक हे बांधकाम कंत्राटदारांनी दिले होते. स्काय लीफ्ट युको बँकेने दिली होती. कॅनरा बँक, साऊथ इंडियन बँक, युनियन बँक, सिंडिकेट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक यांनी प्रत्येकी एक ट्रक दिला होता. त्याचबरोबर झाडांच्या फांद्या, गवत कापणारी मशीन काही वित्तीय संस्थांनी दिली होती.

अनेक संस्थांकडून मदतीचा हात

काही संस्थांकडून वातानुकुलीत यंत्रणा उपलब्ध करून घेतली होती. तसेच फ्लोअर क्लिनिंग मशीनही अशाच पद्धतीने मिळविले होते. आता नव्याने साऊथ इंडियन बँक व कर्नाटक बँक यांच्याकडून गवत व फांद्या कापण्याची 11 मशिन्स मनपाला मिळणार आहेत. डीएमसी कंपनीने मनपाला शववाहिका पुरविली होती. महापौर वैयक्तिक स्वार्थ न ठेवता मनपासाठी कार्यरत असल्याने अनेक संस्था मदतीचा हात पुढे करतात.

अजूनही अनेक संस्थांकडून मिळणार सहकार्य

सीएसआरअंतर्गत एसबीआयकडून पाच लाख खर्चाची तीन पुलवेरायझर मशिन  देण्यात आली आहेत. त्याचे उद्घाटन पुढील आठवडय़ात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर युको बँकेने तीन पुलवेरायझर देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी मुख्यालयाकडे मान्यता प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. कर्नाटक बँकेकडून लवकरच सहा गवत कापणी व झाडांच्या फाद्यांची कापणी करणारी मशिनरी देण्यात येणार आहे. स्पेस डील प्रायव्हेट लि. तर्फे 12 जर्मन पोल क्लीनर देण्यात येणार आहेत, असेही फुर्तादो यांनी स्पष्ट केले आहे.

पणजीतील दोन रस्त्यांची स्वच्छता बँकांकडे

पणजीतील दोन रस्त्यांची स्वच्छता बँकांकडे देण्यासंदर्भात सध्या बोलणी सुरू आहे. 18 जून रस्ता आणि डॉ. पिसुर्लेकर रस्ता या दोन रस्त्यांची साफसफाई कॅनरा बँक आणि साऊथ इंडियन बँकेकडे देण्यासंदर्भात बोलणी सुरू आहे. एका वर्षासाठी या बँका या दोन्ही रस्त्यांची साफसफाई करणार आहेत. कॅनरा बँकेकडे 18 जून रस्त्याची साफसफाई सोपविण्याबाबत चर्चा सुरू आहे. तर साऊथ इंडियन बँकेकडे डॉ. पिसुर्लेकर रस्त्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे. दर 250 मीटरवर बँकांचे फलक लावले जाणार आहेत व साफसफाई करणारे कामगार बँकेचा व मनपाचा लोगो असणारे जॅकेट परिधान करणार आहेत.