|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिल्हा परिषदेतच महिला स्वच्छतागृहाचे ‘तीन तेरा’

जिल्हा परिषदेतच महिला स्वच्छतागृहाचे ‘तीन तेरा’ 

प्रतिनिधी/ सातारा

तात्कालिन राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सुरु केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातही सातारा जिल्हा परिषदेने अव्वल क्रमांक मिळवला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वीही केंद्रात स्वच्छ जिल्हा म्हणून गौरवही झाला आहे. असे असताना गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा परिषदेतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱयांना एकच समस्या भेडसावते ती म्हणजे जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारतीत असलेले महिलांची स्वच्छतागृहाची अवस्था तीन तेराच झाली आहे. त्यामुळे देशात स्वच्छतेचा डंका पिटणाऱया सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतीतच महिला कर्मचारी आणि अधिकाऱयांची गैरसोय होवू लागली आहे. या प्रकारामुळे काखेत कळसा अन् गावाला वळसा असा आभास जिल्हा परिषद प्रशासनाकडून होवू लागला आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर घोरपडे यांनी तात्कालिन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सुचनेनुसार जिह्यातील 1996 गावे हागणदारीमुक्त केली. सर्व गावात वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली. त्यामुळे देशात नंबर वनला सातारा जिल्हा झाला. तसेच सातारा जिह्याचा पंतप्रधानांच्या हस्तेही सत्कार झाला, असे असताना जिल्हा परिषदेच्या इमारतीतच स्वच्छतेचे वावडे दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या दोन इमारती आहेत. त्यामध्ये पुढील इमारतीत महिलांसाठी असलेले स्वच्छतागृह बंद आहे. त्यामुळे त्या इमारतीतील कर्मचारी आणि अधिकाऱयांची गैरसोय होते. तसे पाहता पुढच्या इमारतीत ग्रामपंचायत विभाग, सामान्य प्रशासन विभाग, महिला बालविकास विभाग, परिषद शाखा हे चौथ्या मजल्यावर, तर तिसऱया मजल्यावर कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि बांधकाम विभाग, दुसऱया मजल्यावर शिक्षण विभाग, अर्थ विभाग तर पहिल्या मजल्यावर आरोग्य विभाग आणि बांधकाम विभाग, तळमजल्यामध्ये समाजकल्याण विभाग, जिल्हा बँकेची शाखा, लघुपाटबंधारे विभाग आणि दुसऱया इमारतीमध्ये स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, यासह इतर कार्यालयेही आहेत. यामध्ये महिला अधिकारी आणि कर्मचाऱयांची संख्या मोठी आहे. असे असताना गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषदेतील महिलांच्या स्वच्छतेगृहाची स्वच्छताच नसते. तर कुलूप लावलेले असते. त्यामुळे तात्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनाही भेटून जिल्हा परिषदेतील महिलांनी स्वच्छतागृहाची समस्या मांडली होती. त्यांनी सुचना देवूनही कार्यवाहीच झाली नाही. अजूनही महिलांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. या दोन्ही इमारतीच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता व डागडुजीचा ठेका अभियंत्याकरवी ठेकेदाराला दिला आहे. परंतू ठेकेदाराकडून हे कामच होत नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीतच जर महिलांना स्वच्छतागृहे बंद असल्याने होत असलेल्या गैरसोयीमुळे काखेत कळसा आणि गावाला वळसा, दिव्याखालीच अंधार असाच प्रकार दिसू लागला आहे. प्रशासनाकडून यावर ठोस उपाययोजना होणार कधी अशी मागणी जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱयांमधून होवू लागली आहे.