|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अनिकेतबरोबर अमोलचाही काटा काढायचा होता पण…

अनिकेतबरोबर अमोलचाही काटा काढायचा होता पण… 

प्रतिनिधी /सांगली :

 पोलीस कोठडीत अनिकेत कोथळेचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला. त्याच्या खुनाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे यालाही संपवण्याचा विचार अनिकेतच्या खुनाचा सुत्रधार उपनिरीक्षक युवराज कामटेच्या मनात आला. पण अरूण टोणेने त्याला विरोध केला. त्यामुळे अमोल वाचला. अन्यथा त्यालाही कामटेने मारले असते, अशी माहिती आता पुढे आली आहे. 

आपण एका प्रकरणात पुरते अडकलो आहे, आता दुसरा खून करून पुन्हा अडचणीत वाढ नको, असे सांगून अरूण टोणे याने कामटेला विरोध केला. त्यामुळे अमोल वाचला. पण आंबोली घाटात अनिकेतचा मृतदेह जाळून परत येईपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता. ज्यावेळी त्याला पुन्हा पकडल्याचे सांगून अटक करण्यात आली. त्याचवेळी त्याने सुटकेचा श्वास घेतल्याचे सीआयडीच्या तपासात ही माहीती पुढे आली आहे.

अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे यांनी एकाला लिफ्ट देण्याचा बहाणा करून चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये दोघांनाही अटक करण्यात आली होती. पण अमोल भंडारेच्या समक्षच चौकशीच्या नावाखाली युवराज कामटे आणि त्याच्या चार पोलीसांच्या टोळीने अनिकेतला थर्ड डिग्री वापरली. त्याला पाण्यात गुदमरून मारण्याबरोबरच उलटे टांगून मारहाण केली. त्यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर कामटे आणि टोळीने अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला. या सर्व घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे हा आहे.

या सर्व घटनेमुळे अमोलच्या मनावर प्रचंड दडपण आले होते. तो भेदरलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे अमोल जिवंत राहाणे हे आपल्याला अडचणीचे ठरणार असल्याने त्यालाही संपवण्याचा कामटेचा विचार होता. पण अरूण टोणेने विरोध केल्याने अमोल वाचला. पण कामटे आणि टोळीने अमोलवर प्रचंड दडपण आणले होते. त्याला बरोबर घेऊन फिरत असताना त्याला आपण जे सांगू तेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना आणि घरच्यांना सांगायचे अन्यथा तुझीही अवस्था अनिकेतप्रमाणेच करू असा दमही दिला होता. त्यांच्या दबावाखाली येऊन अमोलने कामटे जे सांगेल तेच सर्वांना सांगायचे कबूल केल्यानंतर त्याला मारायचा बेत रद्द केला. त्यानंतर त्याला निपाणीत पकडल्याचे कामटेने पोलीस उपाधीक्षक डॉ. दिपाली काळे यांना फोन करून सांगितले.

Related posts: