|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आंदोलन चिरडण्याचा पोलिसांकडून प्रयत्न

आंदोलन चिरडण्याचा पोलिसांकडून प्रयत्न 

प्रतिनिधी / बेळगाव

एकिकडे राज्य सरकारच्यावतीने बेळगावात बळजबरीने हिवाळी अधिवेशन भरविण्यात येत आहे. तर आंदोलन काळात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करणाऱया आंदोलकांवर दडपशाही करण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून उघडपणे होत आहे. यामुळे आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनही छेडू नये का? असा प्रश्न आंदोलनकर्त्यांकडून होत आहे. सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध संघटनांच्यावतीने सुवर्ण सौधच्या परिसरात राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन हाती घेण्यात आले होते. मात्र, अनेक संघटनांना आंदोलनस्थळी येण्यापासून पोलिसांनी रोखले. भूमी आणि वसती हक्क वंचित संघर्ष समितीच्या असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी रेल्वे स्थानकावरच दिवसभर रोखून धरले. यामुळे त्यांना आपल्या मागण्या मांडण्याची संधीही देण्यात आली नाही.

भूमी आणि वसती हक्क वंचित संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुवर्णसौधच्या परिसरात आंदोलन छेडून आपल्या मागण्या सरकारदरबारी मांडण्यात येणार होत्या. यासाठी समितीच्यावतीने दि. 13 रोजी ‘चलो बेळगाव’ची हाक देण्यात आली होती. या हाकेनुसार असंख्य कार्यकर्त्यांनी बेळगावात उपस्थित राहण्यासाठी सकाळी रेल्वेस्टेशन गाठले. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना याचठिकाणी रोखून धरले. यामुळे संघटनेच्यावतीने निर्धारित करण्यात आलेले आंदोलन रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर आली. सायंकाळी उशिरापर्यंत कार्यकर्त्यांना रेल्वेस्थानकावरच रोखून धरून एकप्रकारे प्रशासनाच्यावतीने आपला हक्क मागणाऱयांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून राज्य सरकारच्या विरोधात संघटनेच्यावतीने नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

मागील वर्षी बेळगावात झालेल्या अधिवेशन दरम्यान संघटनेच्यावतीने आपल्या मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन छेडले होते. त्यावेळी तत्कालीन महसूलमंत्री आणि कायदा मंत्र्यांनी आंदोलनस्थळी येवून चर्चा केली होती. तसेच मागण्यांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले होते. महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी विशेष समितीची स्थापना करून न्याय मिळवून देण्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही.

यानंतरही संघटनेच्यावतीने तीनवेळा राज्यभरात आंदोलन छेडण्यात आले तरीही उपयोग झाला नाही. यासाठी यंदाही बेळगाव येथे सुरू असणाऱया अधिवेशन दरम्यान आपल्या मागण्यांसाठी सोमवारी सकाळीच समितीचे पदाधिकारी आणि वसतिरहीत गरीब नागरिक मोठय़ा संख्येने बेळगावात दाखल झाले. मात्र, त्यांना आंदोलनाची संधी न देता रेल्वेस्थानकावरच त्यांची अडवणूक करण्यात आली. यामुळे आंदोलनकर्त्यांनी रेल्वेस्थानक आवारातच ठाण मांडून राज्य सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी समितीचे एच. एस. दोरय्यस्वामी, भारतीय कृषक समाजाचे सिद्धप्पा मोदगी यांच्यासह अन्य नेत्यांची भाषणे झाली.

Related posts: