सावंतवाडी तालुक्यातील 15 गावे लेप्टो जोखीमग्रस्त

खासगी डॉक्टरांची आज बैठक : गाववार दक्षता घेणार!
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यात 15 गावे लेप्टो जोखीमग्रस्त आहेत. आतापर्यंत लेप्टो सदृश तापामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. लेप्टोची लागण व तापसरीमुळे तालुक्यातील जनता हैराण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व गावातील खासगी डॉक्टरांची बैठक उद्या बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. सांगेली येथे एक लेप्टो सदृशचा रुग्ण मंगळवारी आढळला. त्याच्यावर गोवा–बांबोळी येथे उपचार सुरू असल्याची माहिती सभापती रवींद्र मडगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक उपस्थित होते.
मडगावकर म्हणाले, तालुक्यात ऑक्टोबरपासून तापसरी व लेप्टोची साथ पसरली आहे. लेप्टो सदृश तापाचे दहा रुग्ण आढळले होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून इतरांची प्रकृती सुधारत आहे. सध्या बांदा, क्षेत्रफळ, शेर्ले, निगुडे, मडुरा, न्हावेली, मळगाव, सोनुर्ली, तळवडे, नेमळे, सांगेली, कुणकेरी, आंबोली चौकुळ, कारिवडे ही गावे जोखीमग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तळवडे येथील उर्वशी उपेंद्र म्हापसेकर (22) यांना लेप्टोची लागण झाली असून त्यांच्या रक्ताचे नमूने मणिपाल हॉस्पिटलला पाठविण्यात आले आहेत. सांगेली व तळवडे गावातील दोन रुग्ण लेप्टोबाधीत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात दक्षता घेण्यात येत आहे. कारिवडे येथे डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले आहेत. तापाच्या वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्व डॉक्टरांची बुधवारी बैठक घेण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची माहिती उपलब्ध होत नसून ती घेण्याच्या दृष्टीने तालुका अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांनी आंबोलीकडे लक्ष द्यावे!
मडगावकर म्हणाले, आंबोली हे पर्यटन स्थळ आहे. येथे ज्या पद्धतीने बाहेरील व्यक्ती मृतदेह टाकत आहेत, ते पाहता आंबोलीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहे. या प्रकारांमुळे पर्यटन आंबोली बदनाम होत असून पर्यटकांनाही सुरक्षितता वाटत नाही. त्यामुळे या मतदारसंघाचे आमदार तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोली पर्यटन स्थळाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आंबोली परिसरात पोलीस गस्ती वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, स्वतंत्र चौकी उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी मडगावकर यांनी यावेळी केली.