|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पालिकेचा घनकचरा प्रकल्पाला निधी आमच्यामुळेच

पालिकेचा घनकचरा प्रकल्पाला निधी आमच्यामुळेच 

प्रतिनिधी/ सातारा

नगरविकास खात्याकडून अधिकृतपणाने सातारा पालिकेला घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी 15 कोटी 39 लाखांचा निधी मंजूर करत पालिकेला 4 कोटी 35 लाख रुपयांचा निधी वर्ग केल्याचा अद्यादेश काढण्यात आला. यावरुन साताऱयात श्रेयवादाचे राजकारण रंगू लागले आहे. सातारा विकास आघाडीचे आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी आमचे नेते खासदार उदयनराजे यांनी लक्ष घातल्याने हा निधी मिळाला आहे, असे निक्षून सांगितले. नगरविकास आघाडीचे अशोक मोने यांनी आमचे नेते आमदार शिवेंद्रराजे यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयातून हा निधी दिला गेला आहे, असा दावा केला. तर भाजपाचे गट नेते धनंजय जांभळे यांनीही मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच हा निधी दिल्याचा दावा केला आहे.

नुकताच राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने काढलेल्या अद्यादेशात सातारा पालिकेला घनकचरा उभारण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने 15 कोटी 39 लाखांचा निधी मंजूर केला असून पालिकेकडे 4 कोटी 35 लाख वर्ग करण्यात आले आहेत. त्यावरुन लगेचच श्रेयवाद रंगू लागले आहे. सातारा शहरातील सर्व कचरा हा सोनगाव कचरा डेपोत जातो. या कचऱयातून होणारा धूर व दुर्गंधीचा त्रास नजिकच्या गावांना सहन करावा लागतो. आता मात्र या कचरा डेपोत घनकचरा व्यवस्थापनचा प्रकल्प होणार आहे. त्यामध्ये शेड, ओला व सुका कचरा वेगळा करुन त्यावर प्रकल्पातून प्लॅस्टिक करण्यात येणार आहे. कचऱयापासून खत तयार करण्यात येणार आहे. ते खत विक्री करण्यात येणार आहे. मात्र या मंजूर निधीवरुन राजकारण रंगू लागले आहे.

उदयनराजेंमुळेच निधी मिळाला

सातारा विकास आघाडीचे आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी यावर हे काम आमचे नेते खासदार उदयनराजे यांनी लक्ष घातल्याने सातारा विकास आघाडीने सातत्याने पाठपुरावा केल्याने झाले आहे. इतक्या दिवस कचऱयावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प नव्हता. आता हा प्रकल्प उभारला जाणार आहे. सोनगाव कचरा डेपोत हा प्रकल्प उभारण्यासाठी आजच टेंडरही काढले आहे. लगेच काम सुरु करतोय. त्यामुळे जकातवाडी, सोनगाव या गावाना जो आठ महिने धुराचा त्रास होतो तो बंद होणार आहे, असे सांगितले.

शिवेंद्रराजे यांनी वारंवार पाठपुरावा केला

मनोमीलनाच्या काळात नगरविकास आघाडीचे नगरसेवकांनी घनकचरा व्यवस्थापन व्हावे यासाठी सातत्याने आपला विचार पालिकेत मांडला. तसेच आरोग्य सभापती अंजली माने यांच्या काळातही आम्ही तसे ठरावही घेतले. आमचे नेते शिवेंद्रराजे यांनी मंत्रालयात वारंवार या प्रकरणी लक्ष घालून पाठपुरावा केल्यानेच प्रकल्प मंजूर होवून निधी मिळाला आहे, असे नगरविकासचे अशोक मोने यांनी दावा केला आहे.

भाजपामुळेच सातारा पालिकेला 200 कोटी दिले

सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे. सातारा शहराच्या सर्वागिण विकासासाठी माझ्यासह आमच्या सर्व नगरसेवकांनी वारंवार कागदोपत्री पाठपुरावा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 200 कोटीचा निधी दिला गेला. त्यामध्ये 3 कोटी विशेष रस्ते अनुदान, दीड कोटी वैशिष्टपुर्ण योजनेसाठी, घनकचरा निर्मूलनाच्या प्रकल्पासाठी 15 कोटी, ग्रेड सेपटर पोवई नाका 60 कोटी, कास उंची वाढवणे 48 कोटी, भुयारी गटर योजनेसाठी 50 कोटी रुपये, अमृत योजनेतून झाडे लावण्यासाठी 3 कोटी निधी दिला आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

Related posts: