|Monday, July 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोतील जमीन परत घेण्यासाठी महसुलमंत्री रोहन खंवटे यांना आमदारांकडून निवेदन

वास्कोतील जमीन परत घेण्यासाठी महसुलमंत्री रोहन खंवटे यांना आमदारांकडून निवेदन 

प्रतिनिधी/ वास्को

देव दामोदर ट्रस्टच्या ताब्यात असलेली वास्को शहरातील जमीन सरकारने परत घ्यावी अशा मागणीचे निवेदन आमदार कार्लुस आल्मेदा यांनी राज्याचे महसुलमंत्री रोहन खंवटे यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत मुरगावचे नगराध्यक्ष दीपक नाईक यांच्यासह नगरसेवक नंदादीप राऊत व नगरसेवक श्रीधर म्हार्दोळकर उपस्थित होते. जमीन करार येत्या डिसेंबर महिन्यात संपुष्टात येत असून हा करार सरकारने वाढवू नये अशी मागणी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सरकारकडे केली आहे.

वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी नुकतीच सरकारकडे देव दामोदर ट्रस्टला देण्यात आलेली जमीन समाजोपयोगी कामासाठी परत घेण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली होती. यासंबंधी त्यांनी नुकतेच महसुलमंत्री रोहन खंवटे यांनाही निवेदन दिले आहे. वास्को शहरातील मध्यवर्ती भागातील सुमारे चार हजार चौरस मिटर क्षेत्रफळाची महत्वाची जमीन 87 साली सरकारने देव दामोदर ट्रस्टला सभागृह उभारण्याच्या अटीवर 30 वर्षांच्या करारावर भाडेपट्टीवर दिली होती. तीन वर्षांच्या काळात करारानुसार सभागृह न उभारल्यास ती जमीन परत घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, ठरावीक मुदतीत ते सभागृह बांधण्यात आले नसले तरी ती जमीन परत घेण्यात आलेली नाही. आता वास्कोत रवींद्र भवन उभे राहिलेले आहे. शिवाय सांकवाळ कला भवन उभे राहणार आहे. त्यामुळे आता या जमीनीवर सभागृह बांधण्याचीही आवश्यकता नाही असे आमदार आल्मेदा यांनी म्हटले आहे.

जमीन भाडेपट्टीचा करार येत्या डिसेंबरच्या 16 तारीखेला संपुष्टात येत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने ही जमीन परत घ्यावी. वास्कोत आणि संबंध मुरगाव तालुक्यात अशा प्रकारची ही एकमेव जमीन असून या जमीनीचा वास्कोसाठी आणि मुरगाव तालुक्यासाठी समाजोपयोगी प्रकल्पासाठी उपयोग होऊ शकतो. आपण विधानसभेतही या जमीनीचा प्रश्न उपस्थित केला होता. चार वर्षांपूर्वी मुरगाव पालिका मंडळानेही ही जमीन सरकारने परत घ्यावी अशी मागणी ठरावाव्दारे केली होती अशी माहिती आमदार आल्मेदा यांनी या निवेदनाव्दारे महसुलमंत्री रोहन खंवटे यांना दिली आहे.

Related posts: