|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवण तालुक्यात 1200 बंधारे बांधणार

मालवण तालुक्यात 1200 बंधारे बांधणार 

तब्बल 55 हजार सिमेंटच्या बॅग्ज उपलब्ध 

पळसंब येथे शुभारंभ

प्रतिनिधी / मालवण:

मालवण तालुक्यात 1200 वनराई व कच्चे बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामपंचायतस्तरावरून तब्बल 55 हजार सिमेंटच्या बॅगा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तालुक्याचा शुभारंभ पळसंब येथे बंधारा बांधून झाला. यात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पंचायत समिती सभापती मनीषा वराडकर यांच्या उपस्थितीत हा बंधारा घालण्यात आला. तालुक्यात दोन महिन्यात 1200 बंधाऱयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली.

‘एक दिवस बंधाऱयासाठी’ या उपक्रमांतर्गत गावागावात वनराई व कच्चे बंधारे होण्यासाठी 56 संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात मुख्यसेविका, केंद्रप्रमुख, पशुपर्यवेक्षक, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी, तांत्रिक अधिकारी तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. गावातील ग्रामसेवकांच्या सहकार्याने महिला बचत गट, सांस्कृतिक मंडळे, हायस्कूलमधील छात्रसेनेचे विद्यार्थीमित्र, ग्रामस्तरावरील सर्व शासकीय विभागांचे कर्मचारी यांना एकत्रित करून बैठका घेण्यात येत आहेत.

तालुक्यातील बंधाऱयांचा शुभारंभ पळसंब गावात झाला. यावेळी सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, कृषी अधिकारी संजय गोसावी, सरपंच दीपिका परब, नवनिर्वाचित सरपंच चंदू गोलतकर, ग्रामसेवक, बांधकाम, लपा, पशुधन, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पळसंबमध्ये एकाचवेळी दोन बंधारे घालण्यात आले.

व्हॉटस् ऍपवर माहिती संकलन

सोशल मीडियातील व्हॉटस ऍपवर वनराई बंधारे मालवण 2017 हा ग्रुप करण्यात येऊन दिवसाचे नियोजन, झालेल्या बैठका, बांधण्यात आलेले बंधारे याची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्याचे संपूर्ण नियंत्रण गटविकास अधिकारी कार्यालयातून करण्यात येत आहे. ग्रामसेवक संघटनेकडूनही यासाठी सहकार्य करण्यात येत आहे. गावाचे नियोजन त्यांच्याकडूनच होत असल्याचेही गटविकास अधिकारी यांनी स्पष्ट केले.

तालुक्यात पाणीटंचाई भासणार नाही

मालवण तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा काही ठराविक गावात भासत असतात. मात्र, इतर गावांत वनराई आणि कच्चे बंधारे घालण्यात आल्यानंतर गावातील विहिरींच्या पाण्याला बऱयापैकी मे महिन्या अखेरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध असतो. किनारपट्टीवरील गावांचाच प्रश्न राहत आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे, असेही गटविकास अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts: