|Saturday, October 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » कलाकार आणि तंत्रज्ञांनी उभारली मेंढपाळ वस्ती

कलाकार आणि तंत्रज्ञांनी उभारली मेंढपाळ वस्ती 

कागदावर उमटलेली लेखकाची कथा रुपेरी पडद्यावर पाहणे हा प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव असतो. लेखकाच्या कल्पनेतून सिनेमातील दृश्य चित्रीत करणे हे दिग्दर्शकाला कधी कधी खूप अशक्यप्राय होते. त्यावेळी निर्माते आणि दिग्दर्शक योग्य तो निर्णय घेऊन त्यात फेरबदल घडवून दृश्य चित्रित करतात. पण, बिस्किट या मराठी सिनेमाच्या बाबतीत दिग्दर्शक रवींद्र शेवाळे यांनी वेगळाच प्रकार केला.

पद्मश्री शेवाळे निर्मित, रवींद्र शेवाळे निर्मित बिस्किट सिनेमाचे पुण्याजवळ जुन्नर भागात चित्रीकरण सुरू होते. अशोक समर्थ आणि लहानगा दिवेश मेडघे यांचे मेंढपाळ वस्तीत एक गाण्याचे चित्रीकरण करायचे होते. अचानक पाऊस पडल्याने नियोजित जागा बदलून दुसरीकडे चित्रीकरण करायचे ठरले. डोंगराळ भागात खरोखरची मेंढपाळ वस्ती शोधून सापडणे कठीण होते. तेव्हा निर्मात्या पद्मश्री शेवाळे आणि दिग्दर्शक रवींद्र शेवाळे यांनी त्याच भागात मेंढपाळ वस्ती उभारण्याचा निर्णय घेतला आणि मग सुरु झाले दोन दिवस – एक रात्रीचे अथक परिश्रम. दिग्दर्शक रवींद्र शेवाळे सांगतात कि, एक तर डोंगराच्या पायथ्यापासून वर माथ्यापर्यंत फक्त मेंढी आणि बकरी जाईल एवढीशी पायवाट होती. आम्ही सर्व तंत्रज्ञ, कलाकार आणि खुद्द निर्मात्या यांच्या सहकार्यांने गावातील काही मंडळीची मदत घेत ट्रक्टरच्या सहाय्याने कच्च्या मातीचा रस्ता तयार केला. परंतु, त्या रस्त्यावरून शुटींगची अवजड वाहनं घेऊन जाणं शक्य नसल्याने काही अवजड सामान तंत्रज्ञांसोबत आम्ही आणि कलाकारांनी अक्षरश: उचलून घेऊन डोंगरच्या माथ्यावर पोहचवले. या सर्व गोष्टीला आम्हाला जवळपास दोन दिवस आणि एक रात्रीचा कालावधी लागला. यासर्व प्रसंगी अशोक समर्थ आणि चिमुरडा दिवेशने देखील सहकार्य केले. सिनेमात तुम्ही जी मेंढपाळ वस्ती बघाल तेव्हा  पुसटशीही कल्पना येणार नाही की यासाठी आम्ही सर्वांनी किती मेहनत घेतली आहे.

लेखकाच्या कल्पनेतून उतरलेल्या सिनेमातील एका दृश्यासाठी दिग्दर्शकाला कधी कधी इतकी मेहनत घ्यावी लागते याची प्रचिती बिस्किट सिनेमातील या प्रसंगावरून लक्षात येते. नयनरम्य दृश्याच्या मागे अनेक मेहनती हातांचा सहभाग असतो याची आठवण करून देण्याचा हा किस्सा सांगताना पद्मश्री शेवाळे यांचे डोळे पाणावले होते. त्या पुढे सांगतात की, आमच्या सर्वांच्या अशाच मेहनतीमधून बिस्किट सिनेमा तयार झाला आहे, येत्या 24 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तो प्रदर्शित होणार आहे. या भागातील नयनरम्य दृश्य किशोर राउत यांच्या सिनेमाटोग्राफीत  टिपली गेली आहेत. सिनेमात अशोक सोबत शशांक शेंडे, पूजा नायक, जयंत सावरकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रसिद्ध लेखक सचिन दरेकर यांनी सिनेमाची पटकथा लिहिली असून चैतन्य अडकर यांनी सिनेमाला संगीत दिले आहे.

Related posts: