|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ट्रकने चिरडल्याने तीन विद्यार्थी ठार

ट्रकने चिरडल्याने तीन विद्यार्थी ठार 

सोलापूर-तुळजापूर रोडवर भीषण अपघातः अभ्यासासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

प्रतिनिधी/ सोलापूर

महाविद्यालयातील स्टडीरूममध्ये अभ्यास करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. रात्रभर अभ्यासानंतर पहाटे चहा पिण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या विद्यार्थ्यांना भरधाव वेगाने जाणाऱया ट्रकने धडक दिल्याने तिघेही जागीच ठार झाले. तर एक जखमी झाला. ही घटना सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील तळेहिप्परगा येथे रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली.

दिपक जयंत गुमडेल (वय 25, रा. पूर्व मंगळवार पेठ), संगमेश मडीवालअप्पा माळगे (वय 21, रा. घोंगडेवस्ती) दोघेही रा. सोलापूर आणि अक्षय विजय आसबे (वय 22, रा. शेळवे, ता. पंढरपूर) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर हेमंत थळंगे (रा. शंकरलिंग मंदिराजवळ, गुरूवार पेठ) हा जखमी झाला आहे.

हे चारही विद्यार्थी नागेश ऑर्किड महाविद्यालयात मेकॅनिकल विभागात शिक्षण घेत होते. पुढच्या महिन्यात परीक्षा असल्याने चारहीजण रात्री महाविद्यालयात अभ्यासाला जात होते. रात्रभर अभ्यासानंतर पहाटे अडीचच्या सुमारास चौघेही चहा पिण्याच्या उद्देशाने स्टडीरूममधून बाहेर पडले. पण, पहाटेच्या सुमारास कॉलेज कॅन्टीन बंद असल्याने त्यांनी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.

दोन दुचाकीवर बसून चौघेही तुळजापूर रोडवरील प्राची हॉटेलजवळ गेले. त्याच सुमारास भरधाव वेगाने जाणाऱया ट्रकने दोन्ही दुचाकींना मागून ठोकरले. यात एक उडून रस्त्याच्या कडेला पडला तर दोनही दुचाकी ट्रकमध्ये अडकल्याने तिघेजण फरफटत गेले.

पहाटेच्यावेळी बाहेर फिरण्यास गेलेल्या नागरिकांना रस्त्यावर चौघे पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती सोलापूर तालुका पोलिसांना दिली व त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात हलविले. पण, उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर जखमी हेमंत थळंगे याच्यावर उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रूग्णालयाला भेट देऊन मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईंकांचे सांत्वन केले. 

मयत संगमेशचे वडील मडीवालअप्पा माळगे हे किर्लोस्कर कंपनीत कामाला आहेत. त्यांना दोन मुली आणि हा एकच मुलगा होता. दोन मुलीपैकी एकीचे लग्न झाले आहे. त्याच्या मित्राने घरी येवून सांगितल्यावर पालकांना अपघाताची माहिती मिळाली. संगमेशवर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दिपक जयंत गुमडेल हा घरात मोठा मुलगा असून त्याला एक लहान बहीण आहे. त्याच्यावर दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

अपघाताची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. अपघातानंतर ट्रक न थांबता पळून गेला आहे. दरम्यान, या मार्गावरील अपघाताच्या वेळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित ट्रक चालकाचा तपास करण्यात पोलीसांनी प्रारंभ केला आहे.

अपघाताला महाविद्यालयच जबाबदार

मयत संगमेश गेल्या आठ दिवसांपासून अभ्यासाला जात होता. रात्री मुले अभ्यासाला येत असतील तर त्यांची काळजी घेणे ही महाविद्यालयाची जबाबदारी आहे. गेटजवळ वॉचमन असताना इतक्या रात्री मुले कशी काय बाहेर पडली. रात्रीअपरात्री काहीही होवू शकते. रात्री मुलांना बाहेर सोडणे चुकीचे असून महाविद्यालय अपघाताला जबाबदार असल्याचा आरोप संगमेशच्या वडीलांनी केला.

सुविधा दिल्या पाहिजे

इतके मोठे महाविद्यालय असताना मुलांना रात्री बाहेर जाण्याची आवश्यकता का भासली. महाविद्यालयातच सोईसुविधा मिळाली पाहिजे. सुरक्षारक्षकाची यात चूक असल्याचे मत मयत दिपक गुमडेलच्या नातेवाईकांनी व्यक्त केले.

Related posts: